चक दे इंडिया ! भारत ज्युनियर हॉकीत विश्‍वविजेता

0

लखनऊ:- बलाढ्य बेल्जियम संघाला धुळ चारत भारतीय संघाने ज्युनियर विश्‍वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. आठव्या मिनिटाला गुरूजंत सिंग आणि 22 व्या मिनिटाला सिमरनजित सिंगने केलेले गोल भारताच्या विजयात निर्णायक ठरले. ज्युनियर हॉकी विश्वचषक जिंकण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे. याआधी 2001 साली भारताच्या युवा संघाने हॉकी विश्वचषक जिंकला होता. घरच्या मैदानावर भारतीय हॉकी संघाने विश्वचषकाला गवसणी घातली हे विशेष.

चुरशीची लढत
लखनऊ येथील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करून बेल्जियमच्या संघाला डोके वर काढू दिले नाही. पहिल्याच डावाच्या सुरुवातीला गुरजंत सिंगने सातव्या मिनिटालाच पहिला गोल डागला. त्यानंतर काही वेळाच्या अंतराने सिमरनजितने दुसरा गोल डागून भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसर्‍या डावाचा खेळ सुरू झाला. मात्र, भारतीय संघाच्या खेळाडूंनी वर्चस्व कायम राखले. बेल्जियमच्या खेळाडूंना आक्रमणाची संधीच दिली नाही. अखेरचे 40 सेकंद शिल्लक असताना बेल्जियमने गोल केला. मात्र, भारताने 2-1 असा सामना खिशात घालत विश्‍वविजेतेपद पटकावले.