पुणे । नवरात्र महोत्सवनिमीत्त चतु:शृंगी मंदिर भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. हे बदल 30 सप्टेंबरपर्यंत राहणार आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील फायर ब्रिगेड, पोलिस वाहने आणि रुग्णवाहिका यांना वगळण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त अशोक मोराळे यांनी म्हटले आहे. नवरात्रोत्सव कालावधीत भाविक मोठ्या संख्येने चतु:शृंगी मंदिरात येतात. मंदिर व परिसरात भाविकांना सुखरूपपणे दर्शन घेता यावे, तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
एमएसईबी कार्यालयासमोरील रस्ता बंद
सन्मान को-ऑप हाउसिंग सोसायटी मिलटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसकडे जाणारा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरून जाणार्या वाहनचालकांनी स्व. पानकुंवर फिरोदिया पथ या मार्गाचा वापर करावा. सेनापती बापट रस्त्यावरील एमएसईबी कार्यालयासमोरील रस्ता बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी एस.बी.जंक्शन व शिवाजी हाउसिंग सोसायटी चौकातून यू-टर्न घेऊन इच्छितस्थळी जावे.
चतु:शृंगी देवीच्या दर्शनासाठी येणार्या नागरिकांनी संभाव्य कारवाई व गैरसोय टाळण्यासाठी त्यांची वाहने शासकीय तंत्रनिकेतन मैदानात पार्क करावीत. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मैदानावर वाहनांना पार्किंगतळाकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. वाहनचालकांनी या ठिकाणी जाण्याकरीता स्व. पानकुंवर फिरोदिया पथाचा वापर करावा. तरी नागरिकांनी व वाहनचालकांनी निर्बंध केलेल्या मार्गावर येण्याचे टाळावे व पर्यायी मार्गाचा वापर करावा.