निगडी । आत्तापर्यंत दागिने, गाडी चोरीला गेल्याचे तुम्ही ऐकले असेल. मात्र, तुमच्या घराच्या दारातून चप्पल चोरीला जात आहेत. त्यापण वारंवार, हे जरा दुर्मीळच ना… आता तुम्ही म्हणाल की, कोण अशा चप्पल चोरणार! पण निगडी, प्राधिकरणात असे घडत आहे. निगडी, प्राधिकरण परिसरात नागरिक चप्पल चोरांमुळे पुरते हैराण झाले आहेत. या भागात राहणार्या महापालिका अधिकार्यांनाही याचा दणका बसला आहे.
एक ते दोघांची ही चप्पल चोर गँग आहे. जी मोठे बंगले, अपार्टमेंट यांच्या दारातील किंवा पोर्चमधील चप्पल चोरत आहे. गेल्या एक दोन महिन्यांपासून हे सत्र वाढले आहे. यात मुळात दुःखाची गोष्ट अशी की, या चप्पल जरी कमी महत्त्वाच्या वाटत असल्या तरी त्यांच्या किंमती भरमसाठ आहेत. त्यामध्ये नामांकित कंपन्यांच्या महागड्या चप्पलचा समावेश आहे. त्यामुळे एक चप्पल जोडीची किंमत पाच ते दहा हजार आहे. आता चप्पल नेमकी ठेवायची कोठे, असा प्रश्न या नागरिकांना पडला आहे.