पिंपरी-चिंचवड : डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालयातील संस्कृत संहिता सिद्धांत विभागाच्या वतीने 10 ते 12 ऑगस्ट या कालावधीत तीन दिवसीय ’चरक चिंतन 2017’ राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आयुर्वेदाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी आयुर्वेदाचा मूळ संहितेतून अभ्यास करावा, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व आयुर्वेद महाविद्यालयातील संहिता, स्वस्थवृत्त, द्रव्यगुण, रसशास्त्र, शल्य, चिकित्सा या विभागातील पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
132 जणांचा सहभाग
या कार्यशाळेत तिन्ही दिवस तज्ज्ञ आयुर्वेद चिकित्सकांनी विद्यार्थ्यांना संस्कृतमधून संहिता वाचन, संदर्भाच्या अन्वयाबद्दल मार्गदर्शन केले. कार्यशाळेत तज्ज्ञ वक्ते वैद्य श्रीरंग गलगली, वैद्य यशश्री जोशी, वैद्य योगिता जमदाडे यांनी आपल्या ज्ञानाने सर्वांनाच प्रभावित केले. कार्यशाळेत एकूण 102 पदव्युत्तर विद्यार्थी, 30 शिक्षकांनी सहभाग घेतला होता. उपक्रमाची सांगता आवळ्याच्या वृक्षांचे रोपण करून करण्यात आली.
संयोजनात यांचा हातभार
कार्यशाळेच्या आयोजनाची प्रमुख जबाबदारी संहिता सिद्धांत विभागप्रमुख डॉ. मृदुला जोशी, डॉ. शीतल रासने, डॉ. अश्विनी पाटील यांनी घेतली होती. तसेच डॉ. वंदना भुसारी, डॉ. प्रशांत खाडे यांच्यासह आयुर्वेद विभागातील सर्व पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेसाठी सहकार्य केले. यशस्वी आयोजनासाठी डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीचे सर्व पदाधिकारी तसेच आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. पांडे, उपप्राचार्या डॉ. मेधा कुलकर्णी यांनी मोलाचे सहकार्य केले.