मुंबई – चर्चगेट रेल्वे स्थानकात आज सकाळी बॉम्बच्या अफवेने एकच खळबळ उडाली होती. मात्र संपूर्ण रेल्वे स्थानकाची तपासणी केल्यानंतर तिथे काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडले नाही. त्यामुळे पोलिसांसह प्रवाशांनीही सुटकेचा निश्वास सोडला होता. बॉम्बची अफवा पसरविणार्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध चर्चगेट रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून या व्यक्तीचा आता पोलीस शोध घेत आहेत.
सकाळ पावणेअकरा वाजता एका अज्ञात व्यक्तीने चर्चगेट रेल्वे स्थानकात बॉम्ब असल्याचा निनावी कॉल केला होता. सकाळी रेल्वे स्थानकात असलेली गर्दी पाहता रेल्वे पोलिसांसह जीआरपी, स्थानिक पोलीस ठाणे, गुन्हे शाखा आणि अतिरेकीविरोधी पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. या पोलिसांनी बॉम्बशोधक व नाशक पथक आणि श्वान पथकासह संपूर्ण रेल्वे स्थानक तसेच परिसरातील पाहणी केली. प्रत्येक लोकलची तपासणी केली असता तिथे पोलिसांना काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. अचानक पोलिसांनी रेल्वे स्थानकाचा ताबा घेतल्यानंतर प्रवाशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र तपासणीनंतर काहीच न सापडल्याने पोलिसांसह प्रवाशांनीही सुटकेचा निश्वास सोडला होता. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु केला आहे.