मुंबई : चर्चगेट स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला गुन्हे शाखेच्या लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. बाबु खेमचंद चौहान (55) असे अटक आरोपीचे नाव आहे.
13 जुलै रोजी सकाळी 10.44 वाजताच्या सुमारास चर्चगेट स्थानक बॉम्बने उडवू देण्याच्या धमकीचा फोन रेल्वेच्या सुरक्षा बल हेल्पलाईनवर आला होता. त्या फोननंतर रेल्वे पोलिसांनी सुरक्षेत वाढ करून संपूर्ण रेल्वे परिसर पिंजून काढला. मात्र हाती काही लागले नाही, त्यामुळे तो फोन खोटा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याबाबत अदखलपात्र गुन्हा नोंदवून लोहमार्ग गुन्हे पोलिसांनी तपास सुरू केला.
लोहमार्ग गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे, विशेष कृती दलाचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव ढाकणे, वांद्रे युनिट क्रमांक 6 चे पोलीस उपनिरीक्षक राहुल उडानशिव व पथकाने तांत्रिकदृष्ट्या या गुन्ह्याचा तपास सुरू केला. त्यादरम्यान ज्या बुथवरून फोन आला होता, त्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे चौहान याला 27 जूनला पकडण्यात आले. सदर इसम हा मिळेल ते कॅटरिंगचे काम करत असून माहीम येथे फुटपथावर राहतो. तसेच हा मूळचा गुजरातमधील अहमदाबादचा रहिवासी आहे.
लोहमार्ग पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच 5 जुलै रोजी संध्याकाळी 7.55 ला रेल्वेच्या 182 या हेल्पलाईनवर फोन करून खारघर मध्ये विस्फोटक सामान भरले असून रेल्वेच्या सुरक्षेत वाढ करा असा निनावी फोन केल्याचेही तपासात समोर आले आहे. सदर इसमाला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.