वांजोळा परीसरात ग्रामस्थांमध्ये घबराट; रानटी डुकराचाही पाडला फडशा
भुसावळ: चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबट्याने उच्छाद मांडल्यानंतर त्यास गोळी घालून ठार मारल्याची घटना ताजी असतानाच भुसावळ तालुक्यातील वांजोळा शिवारात तीन दिवसांपासून बिबट्याने शेतकर्यांना दर्शन दिल्याचा दावा केला आहे तर वनविभागाने मात्र तो प्राणी तडस असल्याचे सांगितल्याने संभ्रम वाढला आहे. बुधवारी वनविभागाच्या अधिकार्यांनी शिवारात पाहणी करून ते पगमार्क बिबट्याचे नव्हे तर तडसाचे असल्याचे सांगितले. वांजोळा परीसरात शेतमजूरांनी स्वत: बिबट्यासारखे हिंस्त्र श्वापद पाहिल्याने घबराट निर्माण झाली आहे.
रानपटी डुकरासह नीलगाईचा पाडला फडशा
वांजोळा शिवारातील सोमवारी तानाजी पाटील यांच्या शेतात मृतावस्थेत रानटी डूक्कर आढळून आले. यावर हिंस्त्र श्वापदाने हल्ला केल्याचे प्रथमदर्शी दिसले तर मंगळवारी सुरज सोनवणे यांच्या गट नंबर 62 मधील शेताच्या शेजारी असलेल्या नाल्यात निलगाईचे पारडू शरीर धडावेगळ्या स्थितीत आढळले. यासह दोन दिवसांपासून पिंप्री शेत शिवार भागात दोन ते तीन शेतमजूरांना बिबटया दिसून आला. याबाबत नागरीकांनी वनविभागाकडे तक्रार केल्याने बुधवारी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी भेट देवून पाहणी केली. कुर्हा पानाचे वनपाल बी.एन.पवार, वनरक्षक एस.आर.चिंचोले, एम.जी.बोरसे, भास्कर पाटील, अभिमन्यू कोळी, नरेंद्र बारी, शिवाजी पाटील, शामराव भील, व्ही.एच.कोळी, विलास पाटील आदींसह सरपंच नरेंद्र पाटील, उपसरपंच देविदास सावळे आदींनी गोंभी फाटा ते पिंप्री शिवार या अडीच किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावर उमटलेले पायांचे ढसे पाहिले. यातून प्रथम हे ठसे कुत्र्याचे असल्याचे सांगतले नंतर मात्र तडसाचे नर व मादी यांचा या भागात संचार असल्याचा निष्कर्ष वनकर्मचार्यांनी लावला मात्र या भागात बिबट्याचा वापर असून वनविभाग केवळ बचावात्मक पवित्रा घेवून घोंगडे झटकत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान वांजोळा शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती गावात कळताच खळबळ उडाली आहे. यामुळे शेतीशिवारात मजूर आणि शेतकरी जाण्यासाठी धजावत नाहीत. ऐन रब्बीच्या हंगामात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.