चर्चेविनाच एका मिनिटात गुंडाळली पालिकेची अर्थसंकल्पीय सभा

0

विरोधकांनी टाकला सभेवर बहिष्कार

भुसावळ: – पालिकेची विशेष अर्थसंकल्पीय सभा सोमवार, 26 रोजी सकाळी 11 वाजता गोपाळ नगरातील पालिका सभागृहात झाली मात्र अवघ्या एका मिनिटातच कुठल्याही चर्चेविना सत्ताधार्‍यांनी हात उंचावून सभेला मंजुरी देत सभागृह सोडले तर विरोधकांनीदेखील सभेवर बहिष्कार टाकला. पालिका सभागृहात जणू सभा न चालवण्याचा पायंडाच पडू पाहत आहे तर विरोधकांनी देखील मुस्कटदाबी होत असल्याने सभेकडे पाठ फिरवणेच पसंत केले आहे.

सोमवारच्या सभेत अर्थसंकल्पाबाबत सविस्तर चर्चा होणे अपेक्षित असताना विरोधकांनी पाठ फिरवल्याने सुज्ञ शहरवासीयांनी तीव्र संताप व्यक्त केला. व्यक्तीगत हेव्यादाव्याचा परीणाम शहर विकासावर होवू पाहत आहे. व्यासपीठावर प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर, उपगटनेता शोभा नेमाडे उपस्थित होत्या. प्रा.सुनील नेवे यांनी स्थायीच्या बैठकीत अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा झाल्याने सर्व विषयांना मंजुरी असल्याचे सांगत सर्व सत्ताधार्‍यांनी त्यास समर्थन केल्याने अवघ्या एका मिनिटातच सभा आटोपली.