चर्‍होलीतील आरक्षणे विकसित करा

0

पिंपरी-चिंचवड : चर्‍होली प्रभाग क्रमांक तीन मधील रस्त्यांची आरक्षणे अनेक वर्षांपासून विकसित झालेली नाहीत. रस्त्यांच्या काही भागांचे भूसंपादन न झाल्यामुळे रस्ते व पर्यायाने या भागाचा विकास खोळंबला आहे. रखडलेल्या आरक्षित जागांच्या भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. त्यामुळे रस्त्यांची कामे सुरू करता येतील. याशिवाय शाळा, क्रीडांगणे आणि नागरी सेवा सुविधाविषयक आरक्षणेदेखील विकसित करण्यात यावेत, अशा सूचना महापौर नितीन काळजे यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. चर्‍होली, मोशी, दिघी, डुडुळगाव, चोवीसवाडी, वडमुखवाडी या भागातील विविध प्रलंबित विकास कामांबाबत महापौर काळजे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक झाली. त्यावेळी महापौरांनी या सूचना दिल्या.

यांची होती उपस्थिती
या बैठकीला आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेविका सुवर्णा बुर्डे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, नगररचना उपसंचालक प्रकाश ठाकूर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे, कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड, उपअभियंता देवेंद्र बोरावके, विनय माने, सुनील शिंदे, प्रेरणा सिनकर आदी उपस्थित होते.

या विषयांवर झाली चर्चा
या बैठकीत पठारेमळा ते डी. वाय. पाटील रस्ता विकसित करणे, कोतवालवाडी ते पठारेमळा रस्ता, पठारेमळा येथील आरक्षण क्रमांक 2/103 प्राथमिक शाळा ताब्यात घेणे, चोवीसवाडी फाटा ते दत्तनगर रस्ता विकसित करणे, भूमी अभिलेख विभागाकडील नकाशे व महापालिकेच्या नकाशांमधील विसंगतीबाबत, बुर्डे वस्ती येथील अस्तित्त्वातील रस्त्यास डी. पी. रस्ता करणे या विषयांवर चर्चा झाली. तसेच चर्‍होली, मोशी या भागातील रखडलेल्या रस्त्यांसाठी आरक्षित जागांचे भूसंपादन लवकरात लवकर करून रस्ते विकसित करण्याच्या सूचना महापौर नितीन काळजे यांनी दिल्या.