महापालिकेच्या स्थायी समितीची मंजुरी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधार्यांनी चर्होलीतील रस्ते विकासावर चांगलाच भर दिला आहे. प्रभाग क्रमांक तीन चर्होली परिसरातील रस्ते विकसित करण्यासाठी येणार्या 50 कोटी रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. 30 मीटर डीपी रस्ता विकसित करण्यासाठी तब्बल 38 कोटी रुपये खर्च येणार आहे. गेल्या 10 वर्षात केवळ रस्त्यांच्या कामांवर महापालिकेने अब्जावधी रुपयांचा खर्च केला आहे. भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनीही रस्तेकामांनाच प्राधान्य दिले आहे. तत्कालीन सत्ताधीशांप्रमाणेच विद्यमान सत्ताधार्यांनी रस्ते विकासावरच भर दिला आहे. गतवर्षी तत्कालीन महापौर नितीन काळजे यांच्या चर्होली प्रभागातील रस्ते विकास कामासाठी तब्बल 425 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यांच्या प्रभागातील रस्ते विकासकामांसाठी निधीचा ओघ अद्यापही सुरुच आहे. आज पुन्हा च-होलीतील रस्ते विकास कामासाठी येणार्या 50 कोटी रुपयाला मंजुरी देण्यात आली आहे.
साईमंदिर, कोतवालवाडी परिसरातील रस्ते
प्रभाग क्रमांक तीन चर्होलीतील सर्व्हे क्रमांक 519 ते 475 पर्यंतचा 30 मीटर डीपी रस्ता विकसित करण्यात येणार आहे. 30 मीटर रस्त्यासाठी तब्बल 38 कोटी 24 लाख 70 हजार 475 रुपये खर्च येणार आहे. हे काम धनेश्वर कन्स्ट्रक्शन यांना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर साईमंदिर, कोतवालवाडी, चर्होली गावठाण या परिसरातील रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी दहा कोटी 77 लाख 82 हजार 247 रुपये खर्च येणार आहे. हे काम श्रीगणेश कन्स्ट्रक्शन यांना देण्यात येणार आहे. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली.