चर्‍होलीत रविवारी महापौर चषक अर्ध मॅरेथॉन स्पर्धा

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वतीने व पुणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या सहकार्याने रविवारी (दि.26) माजी महापौर सादबा उर्फ आप्पासाहेब काटे महापौर चषक जिल्हास्तरीय अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सात वाजता स्पर्धेला सुरुवात होईल, अशी माहिती महापौर नितीन काळजे व क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांनी दिली. विजेत्यास 51 हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेत विजयी होणा-या खेळाडूंना चार लाख 49 हजार रुपयांची बक्षीसे आहेत, असेही त्यांनी सांगितले.

21 व 10 किलोमीटर अंतर
चर्‍होली गाव, मोशी फाटा देहू-आळंदी रोड डुडुळगाव मार्गे चिखली-कुदळवाडी स्पाईन रोड, वैष्णव माता चौक, संत ज्ञानेश्‍वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर अशी ही स्पर्धा होईल. पुरूष गटातील 21 किमीमध्ये च-होली गाव ते संत ज्ञानेश्‍वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर येथे तर महिला गट 10 किलोमीटरमधील च-होली गाव ते संत प्रियदर्शनी स्कूल मोशी चिखली रोडपर्यंत स्पर्धा आहे.

विविध गटात स्पर्धा
या स्पर्धा पुरुष खुलागट 21 किलोमीटर, महिला 10 किलो मीटर आणि 18 वर्ष मुले/मुली-सहा किलो मीटर, 16 वर्ष मुले/मुली- चार कि.मी. तर 14 वर्ष मुले/मुली तीन कि.मी. या गटात आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक गटातील दहा क्रमांकापर्यंत बक्षिसे देण्यात येणार आहेत. रोख पारितोषिके, ट्रॉफी, सर्टिफिकेट हे बक्षिसाचे स्वरुप असणार आहे. प्रथम क्रमांक येणा-याला 51 हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेत विजयी होणा-या खेळाडूंना चार लाख 49 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत नामवंत खेळाडू अभिनव कुमार, प्रवीण हुड्डा सहभागी होणार आहेत, असे महापौर काळजे यांनी सांगितले.