चला करू या, विसर्जन व्यसनांचे!

0

रोटरी जळगाव ईस्टचा उपक्रम; नागरीकांनी स्वयंस्फुर्तीने पुड्या फेकल्या

गणेश विसर्जन मिरवणुकीत जमा झालेल्या तंबाखुजन्य पदार्थ्यांची होळी

जळगाव । रोटरी जळगाव ईस्ट ने गणपती विर्सजनाच्या दिवशी मेहरुण तलाव येथील विर्सजन घाटावर ’चला करू या, विसर्जन व्यसनांचे ही संकल्पना राबविली. यावेळी असंख्य गणेश भक्तांनी आपल्या खिशातील तंबाखुजन्य पदार्थ्यांच्या पुड्या (बार) स्वयंस्फुर्तीने त्याठिकाणी जमा केल्या. या जमा झालेल्या पुड्यांची आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयात होळी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप तिवारी, राजेश यावलकर, रोटरी जळगाव ईस्टचे अध्यक्ष डॉ. गोविंद मंत्री, मानद सचिव मनीष पात्रीकर, अभय कांकरीया, शरद जोशी, विनोद पाटील व सागर मुंदडा उपस्थित होते.

व्यसनमुक्तीचा रोटरीचा उपक्रम स्तुत्य
गेल्या वीस वर्षापासून रोटरी जळगांव ईस्टच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. या गणेशोत्सवातही रोटरी जळगांव ईस्ट ने ‘करु या विर्सजन व्यसनांचे’ हा अभिनव उपक्रम राबविला. रोटरी चा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी यावेळी केले. गणेशोत्सव मिरवणुकीच्या वेळी ’चला करुया, विसर्जन व्यवसनांचे’ या संकल्पनेतंर्गत रोटरी ईस्टने शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत सहभागी गणेश मंडळांना अध्यक्ष डॉ. गोविंद मंत्री, मानद सचिव मनीष पात्रीकर यांनी व्यसन मुक्तीची शपथ दिली. यावेळी विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

मान्यवरांचे मार्गदर्शन
युवकांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण सतत वाढत चालले असुन याला वेळीच थांबवले नाही तर हा व्यसनाधिनतेचा विळखा आणखी वाढत जाईल. आणि अनेकांच्या आयुष्याची धुळधाण करील. याला पायबंद घालण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी जळगांव ईस्टने हा उपक्रम राबविला. विसर्जन मिरवणुकीत रोटरी जळगांव ईस्टचे पदाधिकारी व सदस्य यांनी व्यसनांचे दुष्यपरिणाम सांगितल्याने असंख्य गणेश भक्तांनी व नागरीकांनी खिशातील बार व तंबाखुजन्य पदार्थ्यांच्या पुड्या स्वयंस्फुर्तीने रोटरीच्या सदस्यांकडे जमा केल्याची माहिती रोटरीच्या अध्यक्षांनी दिली.