नवी दिल्ली: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनेने कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केल्यामुळे शिवसेनेने हिंदुत्व ही भूमिका सोडली असे आरोप होत आहे. मात्र शिवसेनेकडून सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चालत असून भूमिका बदलविण्याचा प्रश्न नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका सोडलेली नसल्याचे दाखवून दिले आहे. राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जातील असे संजय राऊत यांनी ट्वीटद्वारे सांगितले आहे.
राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच, आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आला होता. ते कधी अयोध्येला जातील याबाबचत अनिश्चितता होती. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर जातील असे बोलले जात होते. संजय राऊत यांच्या ट्विटमुळे दौऱ्याची नेमकी तारीख स्पष्ट झाली नसली, तरी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर ठाकरे केव्हाही दौरा करू शकतात.