प्रवाशांना मनस्ताप ; असुविधांमुळे एसटी चाक तोट्यातच
फैजपूर:- महाराष्ट्र राज्य शासनाची लाल परी दरवर्षी कोटीचे उत्पन्न राज्याच्या तिजोरीत जमा करीत असली तर एसटीची चाके ही रेंगाळली आहेच. शुक्रवारी सकाळी फैजपूर येथे बस स्थानकात फैजपूर यावल (एम.एच.20 डी. 8926) या नंबरची बस सुरू करण्यासाठी प्रवाशांना दे धक्का देत एसटी सुरू करण्यात आली. यावल आगाराचा गलथान कारभार या प्रकारातून दिसून आला आहे. महाराष्ट्र शासनाची लाल परी अनेक वर्षांपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली असलीतरी नादुरुस्त बसेसमुळे एसटीचा प्रवासी तिच्यापासून लांब जात आहे. प्रवाशांना सुखकर प्रवास व्हावा म्हणून शिवशाही ही आरामदायी बस एकीकडे सुरू करण्यात आली असलीतरी वर्षानुवर्षे रस्त्यावर धावणार्या लालपरीकडे मात्र आगाराचे दुर्लक्ष झाले आहे.
खिळखिळ्या बसमुळे मनस्ताप
शुक्रवारी सकाळी फैजपूर बसस्थानकावर फैजपूर-यावल या मार्गावर धावणारी एसटी (एम.एच.20 डी. 8926) बसस्थानकात आली असता त्यात प्रवाशी चढले मात्र काही केल्या बस सुरू होत नसल्याने अखेर प्रवाशांना खाली उतरवून बस सुरू करण्याची विनंती करण्यात आली. भर उन्हात प्रवासी घामाघूम झाले व त्यांनी धक्का मारल्यानंतर बस मार्गस्थ झाली. यावल आगाराने चांगल्या स्थितीतील बसेस प्रवाशांच्या सेवेस रूजू केल्यास निश्चितच उत्पन्नात वाढ होईल, असा सूर प्रवाशांमधून उमटत आहे.