जळगाव प्रतिनिधी । चारण्यासाठी नेलेल्या रेड्याने चवताळून मालकावरच हल्ला चढल्याने तरुणाचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे.
शहरातल्या रामेश्वर कॉलनीतील गणेश विठ्ठल पवार (वय २५) हा तरूण नेहमी आपल्या म्हशी आणि रेड्याला चारण्यासाठी नेत असे. यानुसार याने सर्व म्हशी व रेड्यास चारण्यासाठी एमआयडीसी परिसरातील माळरानावर नेले होते. दरम्यान, दुपारी १ वाजेच्या सुमारास चवताळलेल्या रेड्याने थेट गणेशवरच हल्ला चढवला. या रेड्याने शिंग मारुन गणेशच्या डाव्या पायाची मांडी, डावा डोळा, नाक व कपाळावर खोलवर घाव केले. सायंकाळी ४ वाजता सर्व म्हशी व रेडा घरी पोहचला. परंतु, गणेश घरी का आला नाही? म्हणून कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. त्याचे वडिल विठ्ठल भोदू पवार यांनी माळरानाकडे धाव घेतली. तेथे गणेश हा वडिलांना निपचित पडलेला दिसून आला. येथेच त्यांना या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला. सायंकाळी उशीरा ही घटना समोर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, मृत गणेश पवारच्या पश्चात आई-वडील, पत्नी, सहा महिन्यांची मुलगी व दोन भाऊ असा परिवार आहे.