महाड : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यामध्ये पोहण्यास तसेच तळ्याच्या काठावर खाद्यपदार्थांची विक्री करणार्या हातगाड्यांना नगरपरिषदेने बंदी करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाच्यावतीने नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत नगराध्यक्षांना निवेदनही देण्यात आले आहे. चवदार तळ्यात अनेक शाळकरी मुले व नागरिक पोहत असतात. 29 जुलैला पोहताना राहिल जोगीलकर या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. अशा घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी तळ्यात पोहण्याला बंदी करण्याची मागणी केली.
बेकायदेशीर पार्कींग हटवण्याची मागणी
रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष मोहन खांबे यांच्या नेतृत्वाखाली कोकण विभाग अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, शहराध्यक्ष प्रभाकर खांबे, जिल्हा उपाध्यक्ष केशव हाटे, सरचिटणीस लक्ष्मण जाधव, अशोक मोहिते, जयराज जाधव, अशोक मोरे यांच्या शिष्टमंडळाने 3 आँगस्टला नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांची भेट घेऊन चवदार तळ्याच्या लगत डॉ. आंबेडकर चौकात खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लावल्या जाता अनेकदा खाद्यपदार्थ तळ्यात टाकले जात असल्याने या खाद्यपदार्थांच्या हातगाड्या नगरपरिषदेने त्वरित हटवाव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे. तसेच तळ्याच्या दक्षिण बाजूला बेकायदेशीररित्या वाहने उभी केली जातात पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी मोहन खांबे यांनी केली.