चविष्ट स्वीट कॉर्न पकोडे

0

पुणे :थंडीमध्ये विविध प्रकारची कडधान्ये खाल्ली जातात. त्यापासून शरीराला ऊर्जा मिळते. या काळात मक्याची कणसे खाण्याची मजाही काही औरच. स्वीट कॉर्न तर मुले आवडीने खातात. याच स्वीट कॉर्नचे काही गरम गरम बनवता आले तर..? यासाठीच ‘पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी’ या सदरात या वेळी आपण पाहत आहोत स्वीट कॉर्न पकोडे.
…….
आजकाल साध्या मक्याच्या कणसांपेक्षा मधुमका म्हणजेच स्वीट कॉर्न जास्त खाल्ले जाते. त्यातही त्याच्या उकडलेल्या दाण्यांची गरम उसळ किंवा भेळ आजकाल सगळीकडे मिळते. थंडीच्या दिवसांत याच स्वीट कॉर्नचं गरम काही बनवलं, तर अर्थात मुले आणि सगळेच आवडीने खातील. स्वीट कॉर्न पकोडे हा असाच एक चटपटीत पदार्थ आहे.

साहित्य :स्वीट कॉर्न – एक कप, बेसन – अर्धा कप, तांदळाचे पीठ – पाव कप, चिरलेली कोथिंबीर – पाव कप, हिरव्या मिरच्या – तीन ते चार, कढीपत्ता, किसलेलं आलं, ओवा-जिरं-तिखट-हळद – आवश्यकतेनुसार, मीठ – चवीनुसार, तळण्यासाठी तेल.

कृती :
– सर्वप्रथम स्वीट कॉर्न दाणे, पाणी न घालता मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या.
– हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, जिरं-ओवा हे एकत्रित मिक्सरमधून वाटून घ्या.
– जाडसर वाटलेल्या स्वीट कॉर्नमध्ये हे हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरं-ओवा यांचे वाटलेलं मिश्रण घाला.
– त्यात गरजेनुसार हळद, तिखट, आणि मीठ घाला.
– हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घ्या.
– आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवा.
– एका डिशमध्ये थोडेसे तांदळाचे पीठ घेऊन त्यात हे गोळे घोळवून घ्या.
– एका कढईत तेल गरम करून घेऊन, त्यात हे गोळे छान खरपूस तळून घ्या.
– तुमचे पकोडे तयार. तांदळाच्या पिठामुळे हे पकोडे आणखी खुसखुशीत होतात.

तयार रेसपी नक्की नक्की टेस्ट करून पहा ….