चव्हाण स्मारक समिती मैदानावर खाडे यांचा सपत्नीक नागरी सत्कार

0

स्मारक उभारण्यासाठी प्राधान्य देणार

पिंपरी: आपल्या माणसांनी केलेला सत्कार हा सर्वात मोठा सत्कार असतो. त्यामुळे मला काम करण्यासाठी अधिक बळ मिळेल. नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी कोणालाही चकरा माराव्या लागणार नाही. तसेच, स्मारक पूर्ण करण्यासाठी मी प्राधान्याने काम करणार आहे, असा शब्द सत्काराला उत्तर देताना पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी रविवारी दिला. निगडी, सेक्टर 27 येथे कै. यशवंतराव चव्हाण स्मारक समिती मैदानावर खाडे यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी खाडे बोलत होते. कै. यशंवतराव चव्हाण स्मारक समितीच्या पुढाकाराने या सत्काराचे आयोजन करण्यात आले. महापौर राहुल जाधव आणि आ. महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थित सत्कार करण्यात आला. उपमहापौर सचिन चिंचवडे, शिवसेनेचे योगेश बाबर, नामदेव ढाके उपस्थित होते. सातारा जिल्हा मंडळ, सोलापूर जिल्हा मंडळ, सांगली जिल्हा मित्र मंडळ, साकोसां ज्येष्ठ नागरिक संघ आणि पश्‍चिम महाराष्ट्र युवा मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.

पक्षाने घेतली दखल
आमदार महेश लांडगे म्हणाले की, प्रामाणिक पक्षाचे काम केले त्याचे हे फळ आहे. त्यांच्या साधेपणाची दखल पक्षाने घेतली. त्यामागे त्यांची प्रचंड मेहनत आहे. प्रामाणिकपणे काम करणार्‍याला ही संधी मिळाल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला काम करण्याची मोठी उर्जा मिळाली आहे. यशवंतरावांच्या स्मारकास सर्वातोपरी मदत करु कै.यशवंतराव चव्हाणांचे मोठे कार्य आहे. एवढया उंचीचा नेत्याचे स्मारक आपल्या शहरात होते ही अभिमानाची गोष्ट आहे. समाजउपयोगी कामासाठी आम्ही कधीच मागे राहत नाही. या स्मारकाला मला काहीतरी करण्याची संधी मिळाली माझे भाग्य आहे. त्यामुळे या स्मारका पुर्णत्वास नेण्यास सर्वातरीपरी मदत करणार आहे. महापौर राहुल जाधव म्हणाले की, खाडे यांनी कायम सातत्य टिकुन ठेवले. पद आले तरी त्यांच्या स्वभावात बदल नाही. त्यामुळे अशा संयमी आणि शांत स्वभावाला समाजात न्याय मिळत असतो. आपल्या जिल्हयातील सुपूत्र म्हणून आपलाच जिल्हाच सत्कार करीत असेल तर, या पेक्षा मोठा सत्कार असू शकत नाही. प्रामाणिक काम केल्याचा हा सत्कार म्हणता येईल. प्राधिकरणाचे रिकामे भूखंडामध्ये पालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या सार्वजनिक सेवेसाठी उपयोगात आणला जाईल.

लोकप्रतिनिधी करतात सहकार्य
समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी स्मारकासाठी लोकप्रतिनिधींनी केलेल्या सहकार्याबाबात आभार व्यक्त केले. महापालिकेमध्ये कोणतेही काम असल्यास तो प्रश्‍न तत्काळ सोडवण्यासाठी विनायक गायकवाड मदतीसाठी धावुन येत असल्याचे आर्वजुन नमूद केले. मधुकर बाबर, जितेंद्र पवार, विठ्ठल गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. गोपाळ मळेकर, शंकर शिर्के, विलास भोसले, शंकर आटकरे, राम तावरे, रमेश चव्हाण, अशोक पाटील, बाळासाहेब फाळके, अमोल भोईटे, जयवंत फाळके, धनंजय सावंत, संतोष जगताप यांनी परिश्रम घेतले. गोपीचंद जगताप यांनी प्रास्तावना केली. सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले. अशोक चव्हाण यांनी आभार मानले.