चष्मा गांधीचा, दृष्टिकोन मात्र नथुराम गोडसेंचा

0

मुंबई : राज्य अभ्यास मंडळाच्या इयत्ता नववीला असलेले इतिहासाचे क्रमीक पुस्तक वादात सापडले असून विधानपरिषद सभागृहात याचे पडसाद उमटले. हे पडसाद इतके तीव्र होते की भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी एकमेकांच्या राष्ट्रीय नेत्यांवर घसरले आणि त्यांच्या स्वातंत्र्य लढाईतील सहभागावर प्रश्न उपस्थित करू लागले. ज्यांनी स्वातंत्र्ययुद्धात बघ्याची भूमिका घेतली, ज्यांनी इतिहासच घडवला नाही, ती मंडळी आज इतिहास बदलवत आहेत, असा आरोप काँग्रेसच्या भाई जगताप यांनी केला. स्वच्छ भारतासाठी सरकारला गांधीजींचा चष्मा लागतो मात्र त्यांचा त्याबाबतीतील दृष्टिकोन नथुराम गोडसेंचा असल्याचा आरोप त्यांनी केला.

सोमवारी सकाळी विधान परिषदेचे कामकाज सुरु झाले. तेव्हा काँग्रेस सदस्य संजय दत्त यांनी प्रश्नोत्तराचा तास बाजूला ठेवून इयत्ता नववीच्या पुस्तकातील चुकीच्या नोंदीविषयी २८९ अन्वये चर्चा घेण्याची मागणी केली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ती फेटाळून लावली, मात्र त्यावर सदस्यांना भूमिका मांडण्याची संमती दिली. बोफोर्स तोफा खरेदी प्रकरणी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर खटला दाखल झाल्याचा या पुस्तकात उल्लेख आहे. मात्र २००४ मध्ये उच्च न्यायालयाने गांधी निर्दोष केल्याची माहिती का नाही, असा सवाल संजय दत्त यांनी उपस्थित केला. या पुस्तकात राजीव आिण इंदिरा गांधी यांच्या कार्याविषयी चुकीची माहिती असून फडणवीस सरकार इतिहासाचे वि कृतीकरण करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सोमवारी विधान परिषदेत केला. मोठ्या गोंधळानंतर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना सरकारच्या सहमतीसह सभागृहाच्या संतप्त भावना इतिहास अभ्यास मंडळाला कळवल्या जातील, असे आश्वासन देणे भाग पडले.

फडणवीस सरकार पूर्वग्रहदूषीत दृष्टिकोनातून लिहिलेला इतिहास पुढे आणत असून ज्या नेहरु-गांधी कुटुंबियांनी देश उभा केला, देशासाठी आपले बलीदान केले, त्यांच्या बदनामीचे हे षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी केला. शेवटी शिक्षण मंत्री विनोद तावडे बोलण्यास उठले. सदर पुस्तक सरकारने नाही तर इतिहास अभ्यास मंडळाने तयार केले आहे. त्यामध्ये सदानंद मोरे, पांडुरंग बलकवडे आदी तज्ज्ञ मंडळी आहेत, असे सांगितले. त्यावर विरोधकांनी बोफोर्स खटल्याचा उल्लेख वगळण्याची मागणी केली. त्याला तावडे यांनी ठाम नकार दिला. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी सुरु केली. सभापतींनी सभागृह तहकूब केले. पुन्हा सभागृह सुरु झाले. तावडे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. पुन्हा गोंधळ आिण पुन्हा सभागृह तहकूब झाले.

घोषणा करत नाय ….! शिक्षणमंत्री निर्णयावर ठाम …
सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन आपण त्या अभ्यास मंडळाला कळवणार आणि मग ते निर्णय घेतील. आपण कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप ते करणार नाहीत . त्यामुळे आक्षेपाहार्य मजकूर वगळण्याची घोषणा करणार नसल्याची भूमिका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मांडली. मात्र सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शेवटी हस्तक्षेप करत मंत्री तावडे यांना तोडगा काढण्याची विनंती केली. सभागृहाच्या संतप्त भावना सरकारच्या सहमतीसह इतिहास अभ्यास मंडळाला कळवण्यात येतील, असे आश्वासन विनोद तावडे यांनी दिले.