पुरवठादाराची तक्रार; महापौरांनी दिले चौकशीचे आदेश
जळगाव– मनपाच्या होणार्या विविध सभांमध्ये चहा आणि खाजगी पुरवठादाराकडून पुरविला जातो. सन 1013 ते 2018 पर्यंत पाच वर्षाच्या कालावधीतील सुमारे 1 लाख रुपयांची बिले नसल्याची तक्रार पुरवठादार सुरेश पाटील यांनी केली.त्यामुळे चहा,नास्त्याच्या बिलांमध्ये अपहार झाल्याची शक्यता वर्तविली जात असल्याने महापौर भारती सोनवणे यांनी मनपाच्या लेखा विभागाला चौकशीचे आदेश दिले आहे.
मनपात होणार्या सभांमध्ये चहा आणि नास्ता मागविला जातो.त्याची बिले संबंधित विभागाला ते देत असतात. संबधित विभागाकडून लेखा विभागातून बिले मंजूर केल्यानतंर रोख स्वरुपात बिलाचे पैसै सुरेश पाटील यांना दिले जातात. सध्या सभांना नास्ता पुरविल्याची बिले पाटील यांना नियमित मिळत आहेत. मात्र, सन 2013 ते 2018 मध्ये तत्कालीन नगरसचिव निरंजन सैंदाणे व सुभाष मराठे यांच्या काळातील बिलांची रक्कम त्यांना आजपर्यंत मिळाली नसल्याची तक्रार सुरेश पाटील यांनी महापौर भारती सोनवणे यांच्याकडे केली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ. चंद्रशेखर पाटील देखील उपस्थित होते. यावेळी सुरेश पाटील यांनी ही बिले लेखा विभागातून हस्ते परहस्ते तर काढली गेली नाहीत ? असा संशय देखील उपस्थित केल्याने महापौरांसह उपस्थित नगरसेवकांनी लेखा विभागाच्या अधिकार्यांना दालनात बोलावून त्यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
परस्पर बिले काढणार्यांविरुध्द तक्रार करा
चहा विक्रेत्यांची बिले इतके वर्षे का थकीत ठेवली? असा जाब नगरसेवक कैलास सोनवणे यांनी अधिकार्यांना विचारला. तसेच ही बिले जर विभागातून कुणी परस्पर काढून पाटील यांना दिली नसतील तर तर संबधितांच्या विरोधात पोलिसात तक्रार करा असेही सोनवणे यांनी लेखा विभागाला सांगितले.