चहार्डीच्या दोघा तरुणांचा अपघाती मृत्यू

0

भरधाव ट्रालाची धडक ; विवाहापूर्वीच तरुणाला गाठले मृत्यूने

चोपडा- महिनाभरावर विवाह आला असताना चहार्डीच्या तरुणाच्या दुचाकीला ट्रालाने धडक दिल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास चोपडा-शिरपूर रस्त्यावर घडली. या अपघातात चहार्डी येथील सागर कैलास शर्मा (24), दीपक कैलास महाजन (21) हे तरुण जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रॉला चालक ट्रॉला जागेवर सोडून पसार झाला. सागरचे 29 जून रोजी जळगाव येथील तरुणीशी विवाह होणार होता. सागर व दीपक हे दोघे तरुण शिरपूर येथील टेक्सटाईल मिलमधून कामावरून सोमवारी सकाळी चहार्डीकडे दुचाकीने येत असताना चोपडा-शिरपूर रस्त्यावर हातेड बुद्रुक येथील वीज वितरण कंपनी कार्यालयाजवळ चोपड्याकडून शिरपूरकडे जाणार्‍या ट्रॉलाने धडक दिली. दीपक महाजन हा कैलास महाजन यांच्या एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्‍चात आई वडील, आजी, आजोबा, दोन बहिणी असा परिवार आहे. दोन्ही ठार झालेले तरुण एकाच गल्लीतील रहिवासी असून सोमवारी सायंकाळी दोघांची एकाचवेळी अंत्ययात्रा निघणार आहे.