चहार्डीतील विद्यार्थ्याचा भिक्षेकर्‍याकडून खून झाल्याचा संशय

0

फुटेजच्या आधारावर जिल्ह्यासह मध्यप्रदेशात शोध ; संशयीताबाबत माहिती कळवण्याचे पोलिसांचे आवाहन

चोपडा- तालुक्यातील चहार्डी गावातील शिवाजी नगरातील मंगेश दगडू पाटील (14) या आठवीतील बालकाचा सोमवती अमावस्येला नरबळीच्या संशयातून खून झाल्याचा प्राथमिक संशय आहे. हा खून गावात आलेल्या 22 ते 25 वयोगटातील एका भिक्षेकर्‍याकडॅन केल्याचा संशय मयत बालकाच्या कुटुंबाने वर्तवल्यावरून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीताच्या शोधासाठी आठ पोलिस पथके जिल्ह्यासह नजीकच्या मध्यप्रदेशात रवाना करण्यात आली आहेत. या भिक्षुकाबाबत काही माहिती असल्यास चोपडा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नरबळीचा संशय ?
मंगेश दगडू पाटील (14) हा विद्यार्थी 2 फेब्रुवारी रोजी आजोबा लोटन राघो पाटील यांना शौचास घेऊन जातो, असे सांगून घरून निघाला मात्र न परतल्याने वडील दगडू लोटन पाटील यांनी सोमवारी चोपडा पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली होती तर मंगळवारी खाजगी हाळजवळ तुटलेल्या अवस्थेतील पाय आढळल्याने विद्यार्थ्याचा नरबळीतून खून करण्यात आल्याचा संशय वर्तवण्यात आला होता. भगवान न्हावी यांच्या शेतात पायाचा तुकडा तर कपडे, चप्पल, रक्त लागलेले दगड चंद्रकांत हरी पाटील यांच्या पडीक शेतात सापडले होते तसेच त्यांच्या घराजवळही शरीराचे काही अवयव आढळल्याने या बालकाचा खून करण्यात आल्याचा दाट संशय आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर विळादेखील आढळला होता. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुरनं.24/2019 भादंवि 363, 364, 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

भिक्षेकर्‍यावर पोलिसांचा संशय
मंगेश पाटील या विद्यार्थ्याचा चहार्डी 2 रोजी गावात आलेल्या एका भिक्षेकर्‍याने खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. गावातील एका घराबाहेर या भिक्षेकर्‍याची पाणी पिताना छवी कैद झाली असून पोलिसांनी हा संशयीत आढळल्यास चोपडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार (8652565000) तसेच पोलिस ठाण्याशी 02586-220333 या क्रमांकावर माहिती कळवण्याचे आवाहन केले आहे शिवाय माहिती कळवणार्‍याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे.

आठ पथके संशयीताच्या शोधासाठी रवाना
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आठ पथकांना जिल्हाभरात तसेच नजीकच्या मध्यप्रदेशात रवाना केले आहे. एका पथकात एका सहाय्यक निरीक्षक तसेच उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याचा समावेश असून पाच ते सात कर्मचारी त्यात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक व कर्मचारीदेखील संशयीताचा शोध घेत आहेत.