कोलकाता – भारतीय संघाचा सर्वोत्तम कर्णधार ठरलेला महेंद्रसिंग धोनीने तो केवल उत्तम क्रिकेटर नसून माणूस म्हणूनही उत्तम आहोत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. धोनी आपल्या मित्रांसोबत विजय हजारे ट्रॉफी जिंकल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये विजय साजरा करत होता. त्यावेळी अचानक त्याची नजर एका चेह-यावर जाऊन थांबली. धोनीला रेल्वेत नोकरी करत असताना ओळख झालेल्या आपल्या या मित्राला ओळखण्यात क्षणाचाही वेळ लागला नाही. लगेच आपल्या मित्राची धोनीने गळाभेठ घेतली आणि आपल्यासोबत रात्री हॉटेलमध्येच डिनर करण्याचे आमंत्रण देऊन टाकले.
थॉमसची खडगपूरमध्ये चहाची टपरी
थॉमस असे धोनीच्या या मित्राचे नाव आहे, थॉमस खडगपूरमध्ये चहाची टपरी चालवतो. थॉमसने सांगितले की, धोनी खडगपूरमध्ये जेव्हा रेल्वे स्थानकात नोकरी करत होता, तेव्हा दिवसातून दोन ते तीन वेळा तो चहा पिण्यासाठी आपल्या टपरीवर यायचा. अनेकदा तो दूध पिण्यासाठीही यायचा. यानिमित्ताने धोनीने आपल्या खडगपूरमधील इतर मित्रांनाही जेवणाचे आमंत्रण पाठवले. धोनीसोबत डिनर केल्यानंतर थॉमसने सांगितले की, धोनीसोबत एकत्र जेवल्याने आपल्याला खूप आनंद झाला असून जेव्हा मी परत खडगपूरला जाईन तेव्हा दुकानाचे नाव ‘धोनी टी स्टॉल’ ठेवणार आहे.
नुकताच केला रेल्वेने प्रवास
भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने क्रिकेट विश्वात उंची गाठली असतानाही वैयक्तिक आयुष्यात त्याचे पाय अद्यापही जमिनीवर असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारलेला धोनी सध्या झारखंडकडून विजय हजारे संघाकडून खेळत आहे. नुकतेच धोनीने खासगी गाडीने प्रवास टाळून झारखंडच्या संघासोबत कोलकातापर्यंत ट्रेनने प्रवास केला आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला होता.
धोनीने जुन्या आठवणी जपल्या
धोनीने आपल्या उमेदीच्या काळात रेल्वे स्टेशनवर तिकीट तपासनीस म्हणून कार्यरत असताना ज्या चहावाल्याकडे तो दररोज चहा प्यायचा त्याची आवर्जुन भेट घेतली. इतकंच नाही, तर जवळपास दशकभराच्या कालावधीनंतरही धोनीने त्या चहावाल्याला ओळखले. धोनीने यावेळी चहा घेत जुन्या आठवणी ताज्या केल्या. चहावाला थॉमसला देखील धोनीने ओळख दाखवल्यानंतर भरून आले. धोनीने थॉमसला रात्रीच्या जेवणाचेही निमंत्रण दिले. धोनी थांबलेल्या हॉटेलमध्ये दोघांनी रात्रीचे जेवण एकत्र केले. धोनीने याशिवाय त्यावेळीच्या आपल्या इतर ११ मित्रांनाही जेवणासाठीचे निमंत्रण दिले. यशाचे शिखर गाठल्यानंतरही आपले मूळ न विसरलेल्या धोनीने जुन्या आठवणी जपून या सर्वांचे मन जिंकले.