भुसावळ- चहा विक्रेत्यास मारहाण करून लूटल्याप्रकरणी विष्णू पथरोड यास बाजारपेठ पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली असून त्याच्या पसार साथीदाराचा कसून शोध सुरू आहे. रेल्वेत चहा विक्री करून उदरनिर्वाह करणार्या सागर साहेबराव अहिरे यास 27 रोजी रात्री टिंबर मार्केटजवळ अडवून आरोपींनी मारहाण करीत त्याच्या डोक्यात वीट मारून नऊ हजार रुपये लुटले होते. या प्रकरणी अहिरे यांच्या फिर्यादीवरून विष्णू पथरोडसह त्याचा साथीदार नरू शंकर डुलगज विरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर शुक्रवारी रात्री विष्णू पथरोड यास अटक करण्यात आली होती. दरम्यान, मारहाणीत जखमी झालेल्या अहिरे याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तपास पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहेत.