दारू घेण्यास घराबाहेर पडल्याच्या वादातून घटना
मुक्ताईनगर- तालुक्यातील चांगदेव येथील आदिवासी पावरी कुटुंबातील महिला घराबाहेर दारू घेण्यास गेल्याचा राग आल्याने पतीने केलेल्या मारहाणीत व भिंतीवर डोके आपटल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. या प्रकरणी आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शांताबाई रामदास बारेला (21) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
वादातून पतीनेच केला पत्नीचा खून
मृत शांताबाई या रविवारी मध्यरात्री दारू घेण्यास बाहेर का पडल्या? याचा जाब विचारत संशयीत आरोपी तथा पती रामदास सरदार बारेला (28) याने वाद घालत मारहाण सुरू केली तर संतापाच्या भरात भिंतीवर डोके आपटल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयत शांताबाई यांचे वडील सरदार जमालसिंग बारेला (रा.कामली, ता.जिल्हा खांडवा, हल्ली मुक्काम चांगदेव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी रामदास बारेलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पतीस अटक करण्यात आली आहे. खुनानंतर उपअधीक्षक सुभाष नेवे, निरीक्षक अशोक कडलग यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक वंदना सोनुने करीत आहेत. दरम्यान, बारेला कुटुंब हे नाशिक जिल्ह्यात मजुरीचे काम करतात मात्र आठ दिवसांपूर्वीच ते शांताबाई यांच्या माहेरी आल्याचे सूत्रांनी सांगितले.