मुक्ताईनगर :तालुक्यातील चांगदेव कासारखेड शिवारातील शेतात शेतमजुराची शिरच्छेद करून हत्या झाल्याच्या घटनेने चांगदेव परिसरात खळबळ उडाली आहे. कुणाच्याही देण्या-घेण्यात नसलेल्या शेतमजुर भिका दयाराम पाटील (65, मूळ रा.जुनोना, ता.भुसावळ) यांची नेमकी कुणी व कुठल्या कारणासाठी केली असावी? या कारणांचा उलगडा पोलिसांकडून केला जात आहे. खुनाच्या चौकशीकामी पाटील यांच्या आप्तपरीवारातील दोघांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे शिवाय त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडूनही माहिती जाणून घेतली जात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
खुनाने चांगदेव हादरले
चांगदेव गावातील शेतकरी विनायक बाजीराव पाटील यांच्याकडे सुमारे दिड वर्षांपूर्वी भिका पाटील हे काम मागण्यासाठी आले होते व त्यानंतर ते शेतमजूर म्हणून त्यांच्याकडे कामाला लागले होते. चांगदेव गावातील वल्लभ नगर भागात राधाबाई चौधरी यांच्या घरात पत्नी व दोन मुलांसोबत तेे राहत होते. पाटील यांच्या दोघा मुलांचा विवाह झाला असून अन्य एका मुलीचाही विवाह झाला आहे. गुरूवारी दिवसभर भिका पाटील हे विनायक पाटील यांच्या कासारखेडा शिवारातील केळी बागेत कामासाठी गेले होते मात्र रात्र उलटूनही ते परतल्याने शुक्रवारी त्यांचा शोध घेतला असता सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शीर नसलेला मृतदेह हाती पडला तर काही अंतरावर मुंडके कापलेल्या अवस्थेत आढळल्याने कुटुंबियांनी मृतदह पाहताच मोठा आक्रोश केला.
श्वानपथकासह ठसे तज्ञ घटनास्थळी
खुनापूर्वी अज्ञात आरोपींनी भिका पाटील यांचे पाय बागायती रूमालाने बांधल्याचे आढळले त्यामुळे आरोपी व मयत ओळखीचे असावेत वा त्यांच्यात झटापट झाली असावी? अशीदेखील शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून या अनुषंगानेदेखील तपासचक्रे फिरवली जात आहेत. घटनेच्या अनुषंगाने श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वान पथक मात्र शेताच्या बांधावरच घुटमळल्याने तेथून आरोपी पसार झाले असल्याची दाट शक्यता आहे.
अपर पोलीस अधीक्षकांची धाव
खूनाची घटना कळाल्यानंतर अपर पोलिस अधीक्षका भाग्यश्री नवटके, पोलिस उपअधीक्षक सुरेश जाधव, मुक्ताईनगरचे निरीक्षक सुरेश शिंदे यांच्यासह जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बी.जी.रोहम व गुन्हे शाखेच्या कर्मचार्यांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे.
मुलाकडे मागितले 50 रुपये
समजलेल्या माहितीनुसार, गुरूवारी भिका पाटील यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी मुलाकडे 50 रुपये मागितले होते त्यामुळे शेतात दरोड्याच्या उद्देशाने कुणी त्यांची हत्या करेल? ही शक्यता कमीच असल्याचे सूत्रांनी सांगितले मात्र दरोड्यासह विविध कारणांच्या अनुषंगाने पोलिसांकडून बारकाईने या खून प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
दोन संशयित ताब्यात
खूनाच्या तपासासाठी पाटील यांच्या नात्यातील कासारखेड, ता.मुक्ताईनगर येथील दोन संशयीत ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात असल्याचे निरीक्षक सुरेश शिंदे यांनी सांगितले. स्थानिक व जळगाव गुन्हे शाखेची पाच पथके तयार करण्यात आली असून ठिकठिकाणी परीसरात ती तपासकामी रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, खून प्रकरणी मुक्ताईनगर पालिसात विनायक बाजीराव पाटील यांच्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे करीत आहेत.