महेश नामपूरकर यांचे प्रतिपादन : तिबेटियन संस्कृतीचे दर्शन घडवणारे ’ऑरा 2018’ प्रदर्शन
पुणे : चांगला रचनाकार होण्यासाठी केवळ शैक्षणिक पदवी महत्त्वाची नाही. तर त्यासाठी कौशल्य, प्रमाण व कल्पकता असायला हवी. विद्यार्थ्यांमध्ये खूप काही करण्याची ऊर्जा असते. त्याला महाविद्यालयीन स्तरावर वाव दिला पाहिजे. आजचे युग हे बहुआयामी असण्याचे आहे. सातत्याने नवीन गोष्टी शिकत राहणे हेच चांगल्या विद्यार्थ्यांचे आणि रचनाकाराचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध रचनाकार आणि पुण्यातील जपानी उद्यान अर्थात ’पुणे ओकायामा फ्रेंडशिप पार्क’चे (पु. ल. देशपांडे उद्यान) लँडस्केप डिझाइनर महेश नामपूरकर यांनी केले.
विद्यार्थ्यांतील कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या कामाचे कौतुक व्हावे, यासाठी सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनतर्फे आयोजित ’ऑरा 2018’ या अंतर्गत सजावट प्रदर्शनाच्या उद्घाटनवेळी नामपूरकर बोलत होते. प्रसंगी सूर्यदत्ता शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. सुषमा चोरडिया, प्रसिद्ध छायाचित्रकार मिलिंद ढेरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक तोष्णीवाल, महाविद्यालयाचे प्राचार्य अजित शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यंदा ’तिबेटियन संस्कृती’ ही या प्रदर्शनाची संकल्पना होती. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांतर्गत केलेले काम, तसेच घर सजावटीसाठीच्या वस्तू, तिबेटातील नृत्य, परंपरा, बुद्ध जीवनशैली आणि ईशान्य भारतातील जीवन शिल्प आणि हस्तकलेच्या माध्यमातून साकारले होते. मुलांनी भरविलेले हे प्रदर्शन अतिशय सुंदर आहे. त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दिसून येत आहे. अतिशय छोट्या स्वरूपात विद्यार्थ्यांनी लडाख-तिबेटचे प्रारूप येथे उभारले आहे, असे डॉ. सुषमा चोरडिया यांनी सांगितले. मिलिंद ढेरे, दीपक तोष्णीवाल, अजित शिंदे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत मार्गदर्शन केले.