महापौर मुक्ता टिळक यांची माहिती
पुणे : सध्याच्या स्पर्धात्मक काळात रोजगार मिळविण्यासाठी कौशल्य व डिजिटल ज्ञान आवश्यक आहे. रोजगार मिळण्याची संधी व देशाचा विकास या उद्देशाने महानगरपालिकेने पुण्यातील सुमारे पाच हजार वंचित तरूणांना डिजिटल साक्षरता व लाइट हाऊस प्रोजेक्ट या प्रकल्पाद्वारे कौशल्य प्राप्तीसाठी प्रशिक्षण, करिअरसाठी पाठपुरावा व जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार असे प्रकल्प यशस्वीपणे राबविले आहेत. आता सोशल इनोव्हेशन म्युझियमद्वारे नवनिर्मिती करणार्यांना समाजासमोर व गुंतवणुकदारांसमोर आपली संशोधित उत्पादने मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. अशी माहिती पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी दिली. हेक्सानिका या फिनटेक सॉफ्ट वेअर आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून टिळक बोलत होत्या. मुक्ता टिळक यांनी संपूर्ण भारतातील निवडक चारशे स्टार्टअप कंपन्यांमधील प्रथम आलेल्या हेक्सानिकाला प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्ल सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी संगणकतज्ञ डॉ. दिपक शिकारपूर, हेक्सानिकाचे अध्यक्ष योगेश पंडीत व नवकल्पना सादर करणारे उपस्थित होते.
गंभीर गुन्हे कमी होण्यास मदत
पंडीत म्हणाले, पुणे हे शिक्षण व सांस्कृतिक केंद्र असल्याने विकासासाठी पुण्याची निवड केली. विमा व बँकिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर निर्मितीमध्ये नवकल्पनांचा वापर पारंपारिक पध्दतीने न करता वेगळ्या वाटेने जाऊन कृत्रिम बुध्दीमत्तेवर गुंतवणूक केली. अथक चार वर्षांच्या परिश्रमाने आम्ही तयार केलेल्या सॉफ्टवेअरमुळेे विमा व बँकिंग क्षेत्रात सुमारे 40 टक्के खर्चाची बचत होईल आणि गैरव्यवहार वेळेवर उघडकीस येऊन सध्या चालू असलेले गंभीर गुन्हे कमी होण्यास मदत होईल.