चांगला समाज घडविण्यात पत्रकारितेचा महत्त्वाचा वाटा

0

बारामती । चांगल्या लेखणीने समाजातील विघातक घटनांविषयी सकारात्मक जनमत तयार होऊन सामाजिक सलोखा राखला जातो. चांगला समाज घडविण्यात पत्रकारीतेचा महत्त्वाचा वाटा असल्याचे मत तहसिलदार हनुमंत पाटील यांनी व्यक्त केले. जिल्हा माहिती कार्यालय, पुणे व बारामती तालुका पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने बारामती उपमाहिती कार्यालयात दर्पण दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश रणशिंग, दत्ता महाडिक, जय बिचकर, बापू शेंडगे, अमोल तोरणे, अमोल निलाखे, संतराम घुमटकर, तैनूर शेख, संतोष जाधव, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.

योजनांचा फायदा घ्या
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी-इंग्रजी भाषेमध्ये वृत्तपत्र चालू केले. पत्रकारीतेच्या माध्यमातून प्रभावशाली लेखन होणे महत्त्वाचे आहे. पत्रकारीता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समाजातील सर्व घटकांना पत्रकारीतेच्या माध्यमातून स्पर्श होत असतो. पत्रकार हा मेहनती असून त्यांनी शासनाकडून राबविण्यात येणार्‍या विविध कल्याणकारी योजनांचा फायदा घ्यावा, असे हनुमंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

विश्‍वासार्ह्यता जपण्याचे आव्हान
सुसंस्कृत समाज निर्माण करण्याची जबाबदारी प्रसारमाध्यमांची आहे. वृत्तपत्र क्षेत्रात विश्‍वासार्ह्यता जपण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या क्षेत्राची व्यापकता वाढली असून माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पूर्वीपेक्षा काम सोपे झाले आहे, असे जिल्हा माहिती अधिकारी सरग यांनी सांगितले. समाजात घडणार्‍या समाजविघातक प्रसंगावर प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने व सकारात्मरीत्या प्रकाश टाकला पाहिजे. शालेय स्तरापासून समाजाची जडणघडण होत असते. सोशल मीडिया या माहितीच्या महासागरातून ज्ञान संपादन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तैनूर शेख यांनी तर आभार माहिती सहायक विलास कसबे यांनी मानले.