पुणे : चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी सरकारने उभे राहीले पाहिजे. मग तो कुठल्याही पक्षाचा असो. तर वाईट काम करणारा आपल्या पक्षाचा जरी असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. काँग्रेस सत्तेत असताना भाजपच्या संस्थावर कारवाई केली जाते. तर भाजप सत्तेत आल्यावर काँग्रेसच्या संस्थावर कारवाई केली जाते.हे थांबवले पाहिजे, असेही गडकरी यांनी नमूद केले. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेडच्या कार्यक्रमात शनिवारी नितीन गडकरी उपस्थित होते.त्यावेळी ते बोलत होते.
गडकरी बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणूक हरलेल्या उमेदवाराला जेव्हा विचारतो का हरलास तेव्हा तो ‘फ्लेक्स लावण्यास पक्षाने पैसे दिले नाही’, असे कारण देतो. पण माझे म्हणणं आहे की, यशाचे अनेक बाप असतात. पण अपयश अनाथ असते, असे म्हणत यशाप्रमाणे अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकले पाहिजे,असा सल्लाही त्यांनी दिला. या वक्तव्यातून गडकरींनी मोदींवर टीका केल्याचीचर्चा सुरु आहे. या कार्यक्रमात सहकार मंत्री सुभाष देशमुख हे देखील उपस्थित होते.