जळगाव । कविता जन्माला येण्यासाठी खूप झळा सोसाव्या लागतात. चांगली कविता लिहिण्यासाठी अनुभव घेणे आणि निरीक्षण करणे महत्वाचे असते. असे मत कवी दुर्गेश सोनार यांनी व्यक्त केले. मूळजी जेठा महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने ‘ संवाद लेखकाशी’ या उपक्रमांतर्गत साम मराठी वाहिनीचे वरिष्ठ निर्माता कवी दुर्गेश सोनार यांचे ‘कवितेने इतुकें द्यावे’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आज आपल्यामधील संवाद हरवत चालला आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आपण व्यक्त व्हायला हवे असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपला काव्यप्रवास उलगडला. कवितेने अनेक गोष्टी दिल्या. त्यामुळेच मी तुमच्यासमोर उभा आहे असेही ते म्हणाले. आजूबाजूला घडणा-या गोष्टी नीट समजून घ्या, निरीक्षण करा, वाचन करा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
प्रसिध्द कवींच्या सादर केल्या कविता
‘राग माझा हा कशाला, चंद्र म्हणतो प्यार कर, हात घे हातात आणि जिंदगीचा यार कर…’अशा स्वरचित गझल आणि कविता त्यांनी सादर केल्या. त्यासोबतच सोशल मिडीया या विषयावर फेसबुकच्या वॉलवर दुष्काळाचा छानसा फोटो अपलोड करून तो वाट बघत बसला कमेंटच्या पावसाची खरच किती सोशल होत चाललोय आपण या नेटवर्कच्या जमान्यात” अशी सामाजिक आशयाची कविता सादर करून रसिकांना अंतर्मुख केले. आज आपली दिशा भरकटत चालेली आहे. योग्य दिशा शोधण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. असेही त्यांनी सांगितले. स्वलिखित ‘हायकू’ देखील त्यांनी सादर केले. ‘सले अजून जखम खोलवर पत्रामधून’ हायकू सादर केले. यावेळी त्यांनी मराठीतील प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर, प्रदीप निफाडकर, इलाही जमादार, इंद्रजीत भालेराव, प्रशांत असनारे, ए.के. शेख, भाऊसाहेब पाटणकर यांच्या प्रेम आणि सामाजिक आशयाच्या गझल सादर केल्या.
रांची होती उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कला विद्याशाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेश तायडे होते. मराठी विभागप्रमुख डॉ. विद्या पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गणेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाला समन्वयिका डॉ. प्रज्ञा जंगले, प्रा. चारुता गोखले, प्रा. योगेश महाले, प्रा. विजय लोहार, प्रा. रोशनी पवार तसेच विद्यार्थी व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.