वरणगाव । सिद्देश्वरनगर येथील रेल्वेपुलापासून ते मन्यारखेड्या पर्यंतच्या शेती रस्त्याचे खडीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने शेतकरी तक्रार करणार आहेत. मन्यारखेडा येथे जाण्यासाठी 2 किलोमिटर अंतराचा रस्ता तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. या रस्त्याची दुरावस्था अनेक दिवसापासून झाली होती. यामुळे शेतकर्यांना आपला माल ने-आण करण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. यामुळे या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी शेतकर्याकडून करण्यात आली होती.
30 फुटाऐवजी 10 फुटाचे केले काम
या रस्ताच्या कामाला मंजुरी मिळून 5 लाख रुपये मंजुर झाले होते. दीड ते दोन किलोमिटर अंतराच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करत अवघ्या दोन दिवसात करण्यात आले. सदरच्या रस्त्याचे काम करताना संबधीत विभागाने प्रथमत: रस्त्याचे मोजमाप करणे आवश्यक होते. तसेच कडेला असलेेल्या काटेरी झुडपांची तोडणी करणे देखील आवश्यक होते. हा रस्ता पुर्वी 30 फुट रूंदीचा होता. मात्र आता हा रस्ता फक्त दहा ते बारा फुट रूंदीचा तयार होत आहे. सदरचा रस्ता तयार करताना खडी अथवा मुरूम पसरविण्याासाठी मजुरांऐवजी ट्रॅक्टरने पसरविला जात आहे. तसेच दबाई करण्यासाठी पाण्याचा वापर केला जात नसल्याने सदरचा रस्ता निकृष्ट दर्जाचा होत आहे. हा रस्ता पुन्हा पुर्ववत होईल. आणि शेतकर्यांना पुन्हा त्रास सहन करावा लागेल यामुळे येथील शेतकरी किशोर भंगाळे यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ए.यु.कुरेशी यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला असता ते फोन उचलत नाहीत. यामुळे सोमवार 19 रोजी सदर कामाबाबत तक्रार करून चौकशीची मागणी करणार आहेत.