श्रीदेवीच्या आकस्मिक निधनाने धक्का बसला नाही, असा एकही भारतीय शोधून सापडणार नाही. ती एक मदमस्त अदाकारा होती, सौंदर्यवती होती, चतुरस्त्र अभिनेत्री होती. गडदलेल्या निशेला ज्याप्रमाणे एखादी चांदणी आपल्या तेजाळलेल्या सौंदर्याने मनाला भुरळ घालते, त्याप्रमाणे भुरळ घालणारी ती एक नायिका होती. आपल्यासह अनेक पिढ्या तिच्या सौंदर्यावर भाळल्या, तिच्या कलेवर फिदा झाल्या आणि ‘ओ मेरी चांदणी..’ गुणगुणत वार्धक्याकडे झुकल्या. एक अभिनेत्री म्हणून तिने ज्या पद्धतीने अभिनयाची छटा सोडली ते पाहता, तिच्यासारखी अभिनेत्री ना झाली ना पुढे होईल.
आपली एक पिढी जिच्या सौंदर्याने, अभिनयाने आणि सामाजिक कर्तृत्वाने कायम प्रभावित झाली, अशी गुणी अभिनेत्री श्रीदेवी काळाच्या पडद्याआड गेली आहे. बॉलिवूडपटातील ती खर्या अर्थाने ‘चांदणी’च होती. ही चांदणी अशाप्रकारे अचानक निखळल्याने अनेकांना धक्का बसला. तिच्या निधनाबद्दल जी काही चर्चा सुरू आहे, त्यातून तिचा मृत्यू नैसर्गिक की अनैसर्गिक? असा प्रश्न निर्माण होतो. प्रथमदर्शनी दुबई पोलिसांनी केलेला तपास पाहता, हा मृत्यू शंकास्पद असून, देशवासीयांसह तिच्या चाहत्यांना मोठा धक्का देणारा आहे. ही ‘चांदणी’ निखळल्याने भारतीयांच्या संवेदनशील मनाला हळहळ वाटत असून, अशी सौंदर्यवती अभिनेत्री पुन्हा होणे शक्य नाही. सदमा चित्रपटात स्मरणशक्ती गेलेल्या पात्राची भूमिका तिने ज्या पद्धतीने साकारली, एका बालिकेची भूमिका तिने ज्या पद्धतीने वठवली, तसा अभिनय आता कुणीही पडद्यावर साकारू शकणार नाही, हे वास्तव आहे.
श्रीदेवीच्या आकस्मिक निधनाने धक्का बसला नाही, असा एकही भारतीय शोधून सापडणार नाही. ती एक मदमस्त अदाकारा होती, सौंदर्यवती होती, चतुरस्त्र अभिनेत्री होती. गडदलेल्या निशेला ज्याप्रमाणे एखादी चांदणी आपल्या तेजाळलेल्या सौंदर्याने मनाला भुरळ घालते, त्याप्रमाणे भुरळ घालणारी ती एक नायिका होती. आपल्यासह अनेक पिढ्या तिच्या सौंदर्यावर भाळल्या, तिच्या कलेवर फिदा झाल्या आणि ‘ओ मेरी चांदणी..’ गुणगुणत वार्धक्याकडे झुकल्या. एक अभिनेत्री म्हणून तिने ज्या पद्धतीने अभिनयाची छटा सोडली ते पाहता, तिच्यासारखी अभिनेत्री ना झाली ना पुढे होईल.
चित्रपटात नायिका म्हटले की त्या शोभेची वस्तू असतात, नायकांच्या अवती-भवती घुटमळणे आणि बागबगिच्यांत नाचणे एवढीच काय ती भूमिका त्यांच्या वाट्याला येत असते. श्रीदेवी अशा भूमिकांना अपवाद होती. सदमात तिने कमल हसनसारख्या कसलेल्या अभिनेत्याच्या तोडीसतोड अभिनय केला होता. तिच्या प्रत्येक चित्रपटात ती अशीच कसदार अभिनय करत गेली. ज्या काळात व्हॅनिटी व्हॅनसारखी सुविधा नव्हती. वेशभूषा किंवा रंगभूषा करायची असली तरी झाडाच्या मागे जावे लागत होते. चित्रीकरणादरम्यान लघुशंका आली तरी अडचण होत होती, म्हणून नायिका पाणीही कमी पित असत, अशा खडतर काळात श्रीदेवी आपल्या अभिनयाची छाप जनमानसावर सोडत होती. चालबाज हा चित्रपट तर त्या काळातील दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या सीता और गीतासारखाच होता. परंतु, श्रीदेवीने ज्या पद्धतीने त्यातील दुहेरी भूमिकांना न्याय दिला, तो पाहता हेमा मालिनीपेक्षाही ती श्रेष्ठ अभिनेत्री असल्याची साक्ष भारतीय दर्शकांना पटली. नगिनामधील तिचा नागीन डान्स कसा विसरता येणार? केवळ डोळ्यांद्वारे भावभावना व्यक्त करणे काही साधे काम नाही, ते काम ती लीलया करत होती. मिस्टर इंडियातील हवाहवाई असो की चांदणीमधील चंचल स्वभावाची युवती असो, एखादी भूमिका केवळ तिच्यासाठीच तयार झाली की काय? इतकी ती भूमिकांशी समरस होत होती. खुदा गवाहमधील बेनझीरप्रमाणे श्रीदेवी ही खरोखर अद्भुत अशी भूमिकांची बेनझीरच होती. तिच्यासारख्या सदाबहार अभिनेत्रीने वयाच्या 54व्या वर्षी जगाचा निरोप घ्यावा, ही बाब काही मनाला पटत नाही. हे काही निघून जाण्याचे वय नाही. गेली 50 वर्षे ही तारका आपल्या अभिनयाने गाजत राहिली. मुलीला अभिनेत्री झालेले पाहण्याचे भाग्यही तिच्या नशिबी आले नाही, ही खरह तर शोकांतिकाच म्हणावी लागेल.
आपल्या कारकिर्दीत तिने त्याकाळच्या दिग्गज अभिनेत्यांसोबत अभिनय केला. महानायक अमिताभ बच्चन, रजनीकांत, कमल हसन, जितेंद्र, ऋषी कपूर, अनिल कपूर या प्रत्येक अभिनेत्यासोबत तिची जोडी जुळली आणि ही प्रत्येक जोडी भारतीय रसिकांना आवडली. हिंदी चित्रपटसृष्टीत अमिताभ यांना सुपरस्टारचा किताब मिळाला होता आणि आश्चर्याची बाब म्हणजे श्रीदेवीलाही लेडी अमिताभ असे अभिमानाने संबोधले जात होते. ज्या काळात अभिनेत्रींना दुय्यमदर्जा मिळत होता, त्या काळात श्रीदेवी ही एक कोटीपेक्षा जास्त मानधन घेणारी प्रभावशाली अभिनेत्री होती. विवाहानंतर अभिनेत्रीची सद्दी संपते व ती चित्रपटापासून दूर जाते किंवा प्रेक्षकवर्ग तरी त्यांना नाकारतो. बोनी कपूर यांच्याशी विवाह व नंतर दोन मुलींना जन्म दिल्यानंतरही प्रेक्षकांनी पुनर्पदार्पण केलेल्या श्रीदेवीला स्वीकारले. तब्बल तीनशे चित्रपटांतून अभिनय करणारी आणि प्रत्येक भूमिका जिवंत वठवणारी श्रीदेवी ही खरोखर चमत्कारिकच अभिनेत्री होती. ज्या वयात तिला मुलीच्या अभिनयक्षेत्रात पदार्पणाचे वेध लागले होते, नेमके त्याच वयात तिला मृत्यूने आपल्या बाहुपाशात घेऊन जावे, ही मोठी शोकांतिका ठरली आहे.
गडदलेली रात्र संपून जाण्याची प्रतीक्षा सर्वच करतात. परंतु, जेव्हा या गडद रात्री एखादी चांदणी आपल्या तेजाने आकाशात सौंदर्य उधळत असेल तेव्हा मात्र ती गडदलेली रात्र प्रत्येकाला हवीहवीशी वाटते, ती संपू नये, असेही वाटते. श्रीदेवीच्या निखळण्याने ही चांदणी लुप्त पावली आहे. तिच्या मृत्यूबद्दल दुबई पोलिसांकडून जे खुलासे होत आहेत, ते पाहता तिचे निधन प्रत्येकाला धक्का देणारे ठरले. दिव्या भारतीच्या आगमनाने श्रीदेवीचे स्टारडम संपेल असे वाटले होते. परंतु, दिव्यानेदेखील अशीच अकाली व संशयास्पद एक्झिट घेतली होती. नेमकी तिच्याच जन्मदिनी श्रीदेवीलाही असाच दुर्दैवी मृत्यू यावा, या अघटित योगायोगाला काय म्हणावे? आपण एक चतुरस्त्र, गुणी आणि सौंदर्यशाली अभिनेत्री गमावली आहे. ईश्वर तिच्या आत्म्यास शांती प्रदान करो!