कोथरूड । चांदणी चौक येथील उड्डाणपुलासाठी पायाभूत सुविधा व जागा ताब्यात घेण्याबाबत कार्यवाही व उपाययोजण्यासाठी तातडीने बैठकीचे आयोजन करण्याची मागणी आमदार मेधा कुलकर्णी यांनी महापौर व आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
चांदणी चौक येथील उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात 11 मे 2017 रोजी महापौर दालनात आयुक्त, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व एक्स. सी. सी. या सल्लागार कंपनीचे अधिकारी यांच्यासमवेत एकत्रीतरीत्या बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी काही प्रमाणात रेंगाळली आहे. यासाठी वाहतूक विभागासमवेत प्राथमिक बैठक 25 मे 2017 रोजी घेण्याचे ठरले होते. मात्र ती बैठकसुद्धा झाली नाही. त्यामुळे निविदा प्रक्रियेला भरघोस प्रतिसाद मिळत असूनही ती प्रक्रिया लांबवावी लागली व निविदा प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे या उड्डाणपुलासंदर्भात जॉईंट मेजरमेंट व जागा ताब्यात घेण्यासंदर्भात कार्यवाही व उपाययोजना होण्यासाठी त्वरित बैठकीचे आयोजन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे या निवेदनात कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
12.56 हेक्टर जागा या उड्डाणपुलासाठी ताब्यात घ्यावी लागणार आहे. याचा सविस्तर सर्व्हे करण्यासाठी सिटी सर्व्हे व पुणे महापालिका यांच्याद्वारे संयुक्त मोजमाप घेऊन बाधित जागामालकांची यादी तयार करून एकमेकांच्या मान्यतेने जागा ताब्यात घेण्याकरिता 18 ते 24 मे 2017 यादरम्यान दुसरी बैठक घेण्याचे ठरले होते. मात्र अद्याप ती बैठक बोलावण्यात आली नाही. तसेच या कामाच्या पहिल्या फेजसाठी 24 महिने व दुसर्या फेजसाठी 18 महिने कालावधी लागणार असून वाहतुकीत काही बदल करावे लागणार आहेत.