पुणे । चांदणी चौकामधील उड्डाणपुलासाठी करण्यात येणार्या भूसंपादनापोटी बाधितांना कागदपत्रांची तपासणी होताच; तातडीने मोबदला देण्यात येईल तसेच बीडीपीमधील जागा मालकांना रस्त्यांच्या भूसंपादनापोटी टीडीआरच्या धर्तीवर मोबदला जाईल, अशी ग्वाही महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.बावधन येथील मराठा मंदिरात या कामासाठीच्या प्रकल्पबाधित नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तपकीर, आयुक्त कुणाल कुमार, सतीश कुलकर्णी, सुहास चिटणीस आदी उपस्थित होते.
या पुलाचे भूमिपूजन ऑगस्ट, 2017 मध्ये झाल्यानंतर अद्यापही या पुलासाठी एक इंच जागेचे भूसंपादन प्रशासनास करता आलेले नाही. तसेच हे भूसंपादन न झाल्याने या पुलाचे काम करणार्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 31 डिसेंबर, 2017पूर्वी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण न झाल्यास हे काम करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाची कोंडी झालेली असून तातडीने भूसंपादनासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.या कामासाठी बाधित 88 फ्लॅटधारक आणि जागामालकांची तातडीची बैठक शुक्रवारी बोलविण्यात आली होती. या बैठकीत नागरिकांच्या शंकाचे समाधान करण्याबरोबरच त्यांना देण्यात येणार्या मोबदल्याची माहितीही देण्यात आली. यावेळी कुलकर्णी यांनी भूमीअधिग्रहण संदर्भात कायदे व त्यांची अंमलबजावणी कशापद्धतीने करणार याचे सादरीकरण केले. ह्या प्रकल्पाकरता स्वतंत्र कक्ष डेप्युटी इंजिनीअर व सर्वेअरची यांच्या नियुक्ती होऊन सोमवारपासून आपल्या क्षेत्रीय कार्यालयात ते उपलब्ध असतील. त्यानंतर अशा वारंवार बैठका घेऊन प्रत्येक बाधित नागरिकांशी बोलणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
महापालिकेद्वारे एकत्र मोजणी करण्यात येईल व त्याआधारे एकूण बाधित जागा त्याचा मोबदला निश्चित होऊन ताबडतोब तो प्रकल्पग्रस्तांना देण्यात येईल. फ्लॅटधारकांना रोख स्वरूपात व जागाधारकांना स्वरूपात तो उपलब्ध होईल. त्यासाठी नागरिकांनी त्यांची मालकी हक्क सिद्ध करणारी कागदपत्रे घेऊन कक्ष अधिकार्यांना भेटावे. ती कागदपत्रे व संयुक्त मोजणी यांची छाननी होऊन सर्वांना त्वरित मोबदला उपलब्ध होईल. बीडीपीमध्ये नागरिकांना रस्त्याच्या मोबदल्याप्रमाणे टीडीआर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.