चांदणी चौक उड्डाणपुलाचे रविवारी डिजिटल भूमीपूजन

0

पुणे । चांदणी चौकात नव्याने उभारण्यात येणार्‍या दुमजली उड्डाणपुलाचे भूमीपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी (दि. 27) सकाळी दहा वाजता होणार आहे. बावधन येथील मराठा मंदिर येथे डिजिटल भूमीपूजनाचा कार्यक्रम होईल. चांदणी चौक म्हणजे शहराचे पश्चिम प्रवेशद्वार आहे. तब्बल 419 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक यांच्यासह आमदार, खासदार, नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.

चांदणी चौकातून मुंबई, मुळशी, सातारा, कोथरूड आणि एनडीए रस्त्याकडे जाता येईल अशी या पुलाची रचना करण्यात आली आहे. या पुलासोबत पाषाण, बावधन ते कोथरूड मार्गासाठी दोन सब वे तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी तब्बल 419 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. दोन ते तीन वर्षांत या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती आमदार मेधा कुलकर्णी यांनी दिली. पुलाच्या कामासाठी 27 हेक्टर जागेचे संपादन करावे लागणार आहे. त्यातील 12 हेक्टर जागेचे भूसंपादन महापालिका करणार असून त्यातील सव्वा हेक्टर जागा खासगी आहे. उर्वरीत जागा शासकीय संस्थांची आहे.