चांदणी रेल्वे स्टेशनच्या रेखाचित्रात फेरफार केल्याने घडली दुर्घटना
महाव्यवस्थापक अलोक कन्सल यांची माहिती ; भुसावळ विभागात सुरक्षा दौर्यात केली पाहणी
भुसावळ : मध्य रेल्वेच्या चांदणी रेल्वे स्टेशनवर पाच दिवसांपूर्वी समोरील छताचे बांधकाम कोसळले होते. यात एक धक्कादायक बाब समोर आली असून रेल्वे स्टेशनचे बांधकाम ज्या रेखाचित्रानुसार करण्यात आले, त्या रेखाचित्रात फेरफार करण्यात आली त्यानुसार हे बांधकाम झाले नव्हतेत्यामुळे दुर्घटना घडली सुदैवाने मात्र कुठलीही जिवीतहानी झाली नाही. याचा तपासणी अहवाल दोन दिवसात मिळेल, याप्रकरणी संबंधीत अभियंत्याला निलंबीत करण्यात आले असून रीपोर्टमध्ये आणखी काही त्रृटी आढळल्यास त्यातील दोषी अधिकारी आणि ठेकेदारावरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अलोक कन्सल यांनी दिली. भुसावळ विभागाचा मंगळवारी त्यांनी सुरक्षा पाहणी दौरा केल्यानंतर दैनिक जनशक्ती प्रतिनिधने त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते.
भुसावळ विभागाचा मंगळवारी पाहणी दौरा
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अलोक कन्सल यांनी मंगळवारी भुसावळ विभागात सुरक्षा पाहणी दौरा केला. सकाळी 10 वाजेपासून ईगतपुरी येथून दौर्याला प्रारंभ झाल्यानंतर दुपारी चार वाजता भुसावळ येथे महाव्यवस्थापकांचे आगमन झाले. या दरम्यान त्यांनी रेल्वे स्टेशन आणि ट्रॅकची पाहणी केली. भुसावळ रेल्वे स्थानकावर त्यांचे आगमन झाले असता कन्सल यांनी स्थानकाच्या दक्षिणेकडील उद्यान, पार्किंगची पाहणी केली. यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वरील कॅन्टीन, प्रवासी प्रतीक्षालय तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या वातानुकूलीन विश्रामगृहाची पाहणी केली. यावेळी त्यांनी समाधान व्यक्त केले.
सुविधांबद्दल व्यक्त केले समाधान
आपल्या दौर्याबाबत माहिती देताना कन्सल म्हणाले की, सध्या कोरोनामुळे रेल्वेची रहदारी कमी झाली असून प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे. एरव्ही 35 हजार प्रवासी दररोज ये-जा करतात मात्र सध्या दिवसभरात सुमारे चार हजार प्रवासी प्रवास करीत आहे. तरीदेखील रेल्वेने सुविधांमध्ये कुठलीही कसर सोडली नसल्याचे सांगितले.
चांदणी रेल्वे स्थानक दुर्घटनेत अभियंता निलंबीत
चांदणी रेल्वे स्टेशनवर पाच दिवसांपूर्वी समोरील छताचे बांधकाम कोसळले होते. याप्रकरणी महाव्यवस्थापकांना विचारणा केली असता ते म्हणाले की, प्राथमिक चौकशीत कॅन्टीलिव्हर बीमच्या गंजण्यामुळे बाल्कनीचा स्लॅब खाली पडला आणि स्टेशनच्या इमारतीच्या दर्शनी भिंतीस लागून आदळल्यामुळे समोरच्या भिंतीचे नुकसान झाले. यात कोणासही इजा झाली नाही व रेल्वे वाहतुकीस अडथळादेखील निर्माण झाला नाही. प्राथमिक चौकशीच्या आधारे वरीष्ठ बांधकाम अभियंता ज्यांचे देखरेखीखाली बांधकाम झाले होते त्यांना निलंबित करण्यात आले आहे. ही दुर्घटना झाली त्यावेळेस कुठलीही रेल्वे आलेली नव्हती, जवळपास पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे कन्सल म्हणाले.
तिसर्या रेल्वे मार्गाचे काम दोन महिन्यात होणार पूर्ण
तिसर्या रेल्वे मार्गात भुसावळ ते भादली सुरु झाले असून, भादली ते जळगाव अपूर्ण आहे. मार्चपर्यंत कामासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, कोरोनामुळे मजूर मिळत नसल्याने काम रखडले आहे. पुढील एक-दोन महिन्यात हे काम पूर्ण होईल, चौथ्या मार्गाचे काम मोठे असून, त्यास किमान वर्षभर तरी लागतील, असे डीआरएम विवेककुमार गुप्ता म्हणाले.
पादचारी पुलाच्या कामास येणार गती
रेल्वे स्थानकावरील जुन्या पादचारी पुलास तोडून त्याचे नुतनीकरण केले जात आहे मात्र कोरोनामुळे या कामालादेखील फटका बसला आहे. या पुलाची पाहणी केली असून बहुतांश काम झाले असून महिनाभरात काम पूर्ण होणार असल्याचे महाव्यवस्थापक यांनी सांगितले. तसेच प्रवाशांसाठी पर्यायी दादरा सुरू आहे. केवळ जुना पूल बंद करून त्यावर नवीन पुलाची निर्मिती होत आहे. याचा फारसा परीणाम होत नसून लवकरच त्याचेही काम पूर्ण होईल, असा विश्वास महाव्यवस्थापकांनी व्यक्त केला.