चांद्रयान मोहीम- ३ साठी सरकारची मान्यता

0

नवी दिल्ली: चांद्रयान २ मोहिमेदरम्यान विक्रम लँडरचे चंद्रावर यशस्वी लँडिंग न झाल्याने देशाला, तसेच इस्रोला धक्का बसला होता. पुन्हा एकदा इस्रो चांद्रयान मोहिमेसाठी सज्ज झाला असून, चांद्रयान मोहीम ३ साठी केंद्रसरकारने मान्यता दिली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

के. सिवन म्हणाले की, चांद्रयान- 3 मोहिमेसाठी केंद्र सरकारने मान्यता दिली असून या मोहिमेवर सध्या वेगाने काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चांद्रयान-2 मोहिमेवर चांगली प्रगती केली होती. लँडर चंद्राच्या पृष्टभागावर आदळून तुटला असला तरी चांद्रयान-2 मोहिमेवेळी पाठवलेले ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे कार्यरत आहे. तसेच पुढील सात वर्षांपर्यंत ऑर्बिटर कार्यरत राहणार असल्याचे के. सिवन यांनी सांगितले.त्याचप्रमाणे गगनयान मिशनचं डिझाईन पूर्ण तयार असून या मोहिमेसाठी 4 आंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती देखील के. सिवन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान लँडरला चंद्राच्या पृष्टभागावार यशस्वीरीत्या उतरवण्यात अपयश आल्यानंतर इस्रोने चंद्रावर पुन्हा एकदा झेप घेण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी इस्रोने विविध समित्यांची नियुक्ती केली आहे. तसेच तीन उपसमित्यांच्या पॅनलसोबत उच्चस्तरीय बैठकाही झाल्या आहेत.