चाकणच्या नगराध्यक्षपदी मंगल गोरे

0

चाकण : चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनापुरस्कृत मंगल विनोद गोरे या मोठ्या मताधिक्यांने निवडून आल्या आहेत. गोरे यांनी राष्ट्रवादीच्या वृषाली देशमुख यांचा पराभव केला आहे. गोरे यांना 16 तर देशमुख यांना 7 मते मिळाली. ही निवडणूक दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यातच एका अपक्ष उमेदवाराचे अपहरण झाल्याने या निवडणुकीत अधिकच रंगत वाढली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला धूळ चारत शिवसेनेने गड आपल्याकडे कायम राखण्यात यश मिळविले आहे.

निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश
अपक्ष उमेदवार मंगल गोरे व राष्ट्रवादीच्या वृषाली देशमुख यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अपक्ष नगरसेवक प्रवीण गोरे यांच्या अपहरण नाट्यानंतर चारही अपक्ष नगरसेवक व भाजपच्या नगरसेविकेचा मुलगा यांना पोलिसांनी कर्नाटकमधून सुखरूप चाकणला आणून नातेवाईकांच्या ताब्यात दिले होते. अपक्ष उमेदवारांना फोडल्याची जोरदार चर्चा झाल्याने नगराध्यक्ष कोणाचा होणार याचीच चर्चा रंगली होती. नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार मंगल गोरे यांचा प्रथमतः आमदार सुरेश गोरे यांच्या कार्यालयात जाऊन शिवसेना पक्षात प्रवेश करण्यात आला.

असे झाले मतदान
प्रांताधिकारी सुनील गाढे व मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. गोरे यांना उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे, नगरसेवक प्रकाश गोरे, मंगल गोरे, ऋषिकेश झगडे, स्नेहा जगताप, शेखर घोगरे, किशोर शेवकरी, सुदाम शेवकरी, नीलेश गोरे, प्रवीण गोरे, सुजाता मंडलिक, हुमा शेख, प्रकाश भुजबळ, पूजा कड, धीरज मुटके व भाजपच्या सुरेखा गालफाडे यांनी मतदान केले. तर देशमुख यांना राष्ट्रवादीचे नगरसेवक व विरोधीपक्ष नेते जीवन सोनवणे, वृषाली देशमुख, संगीता बिरदवडे, मेनका बनकर, अनिता कौटकर, अश्विता लांडे, स्नेहा भुजबळ यांनी मतदान केले.

कडक बंदोबस्त
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस उपविभागीय अधिकारी राम पठारे व पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या पोलिस बंदोबस्तात आजची निवडणूक पार पडली. नगरसेवकाच्या अपहरणामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. निवडीनंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी फटाके वाजवून व भंडारा उधळून एकच जल्लोष केला. गोरे यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. आमदार सुरेश गोरे यांच्याहस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण मांजरे, जिल्हा परिषद सदस्या रुपाली कड, पंचायत समिती सदस्या वैशाली जाधव, शहरप्रमुख महेश शेवकरी व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.