चाकणमध्ये तिप्पट पैशांच्या आमिषाने साडे आठ लाखाला गंडा

0

माहिती व तंत्रज्ञान अंतर्गत गुन्हा दाखल

चाकणः दुप्पट-तिप्पट पैशांचे खोटे आमिष दाखवून वाकी बुद्रुक (ता. खेड) येथील तरुण उद्योजकाला चक्क साडेआठ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उद्योजकाने चाकण येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी शुक्रवारी (दि.22) रात्री उशिरा मध्यप्रदेशच्या दोन भामट्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आशुतोष राणा व रुदी (पूर्ण नाव समजले नाही. दोघेही रा. इंदोर, मध्यप्रदेश) या ट्रेड इंडिया रिसर्च कंपनीतील दोन कर्मचार्‍यांवर माहिती व तंत्रज्ञान अंतर्गत आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक गुलाब टोपे ( वय 34, रा. वाकी बुद्रुक) यांनी फिर्याद दिली.

ट्रेड इंडियाच्या सहकार्याने ट्रेडिंग
अशोक टोपे यांचे वाकी बुद्रुक गावच्या हद्दीत श्री साई पॅकेजिंग या नावाने इंडस्ट्रीअल पॅकेजिंगचा व्यवसाय आहे. टोपे यांची पत्नी अश्‍विनी टोपे यांच्या नावाने आयसीआय बँकेमध्ये डीमॅट खाते आहे. त्या खात्यावरून टोपे हे ट्रेडिंग करत असतात. या ट्रेडिंगकरिता टोपे हे इंदौर, मध्यप्रदेश येथील ट्रेड इंडिया रिसर्च या कंपनीकडून मार्गदर्शन घेत असत. या दरम्यान टोपे यांना इंदौर येथून त्या कंपनीतील आशुतोष राणा व रुदी हे ट्रेडिंग संदर्भात संपर्क साधत असत. राणा व रुदी यांनी वेळोवेळी टोपे यांचा विश्‍वास संपादन करून त्यांची फसवणूक केली. सोमवार ( दि. 4) इंदौर येथून रुदी याने तर, दोन तासांच्या फरकाने राणा याने फोन करून सब डीमॅट खात्यात रकमा भरा, आणि त्यानंतर तुम्हाला काही दिवसातच दुप्पट रोकड मिळेल, असे खोटे सांगितले. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून टोपे यांनी वेळोवेळी राणा व रुदी यांनी दिलेल्या खात्यावर व्यवसायातून मिळालेला पैसा भरला.

दोघांचे मोबाईल बंद
आपली आर्थिक फसवणूक होत आहे. याची त्यांना पुसटची कल्पना देखील आली नाही. मात्र, दरम्यानच्या कालावधीत टोपे यांनी आपल्या खात्यावर जादा पैसे जमा झालेत की नाही, याची खात्री केली. आयसीआयसीआय बँकचे डीमॅट खात्यावर मात्र काहीच पैसे जमा झाले नव्हते. आपली आर्थिक फसवणूक झाली आहे, याची जाणीव होताच टोपे यांनी इंदोर, मध्यप्रदेश येथील ट्रेड इंडिया रिसर्च कंपनीतील कर्मचारी रुदी व आशुतोष राणा यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांचे मोबाईल बंद लागले.

पोलिसांकडून तपास सुरु 
रुदी व राणा यांनी संगनमताने टोपे यांना अमित गेरा यांच्या बँक ऑफ बडोदा, शामगड येथील डीमॅट खात्यावर 1 लाख रुपये भरल्यास 5 दिवसात 7 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळतील, असे आमिष दाखवून व ते खरे असल्याचे भासवले. टोपे यांना त्यांच्या चाकण येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या खात्यातून वेळोवेळी एकूण 8 लाख 61 हजार 790 रुपये ऑनलाईन भरण्यास भाग पाडून माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करत लुबाडले आहे. टोपे यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी रुदी व आशितोष राणा (दोघेहो रा. इंदोर, मध्यप्रदेश) यांच्यावर सीआरपीसी 154 प्रमाणे आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.