चाकण आंबेठाण रस्ता अत्यंत खराब

0
चाकण : यंदाच्या पावसाळ्यात चाकण आंबेठाण रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, शाळकरी मुले, मुली यांना चाकणला येणे अवघड झाले आहे. ग्रामीण भागाला जोडणार्‍या या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठाले खड्डे पडलेले असल्याने खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्या सूचनेनुसार अखेर चाकण नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. चाकण आंबेठाण रस्त्याची तात्पुरती डागडुजी झाल्याने दळणवळण सोयीचे होणार आहे.
चार महिन्यात काम मार्गी
दरम्यान, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता संतोष पवार यांनी सांगितले की, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने चाकण नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये खडी टाकण्यात येत आहे. चाकण आंबेठाण रस्त्याचे काम पुढील चार महिन्यांमध्ये मार्गी लागणार आहे. महामार्गावरील चाकण येथील आंबेठाण चौक ते भांबोली हद्दीपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. यामुळे जनतेच्या रोषाला सार्वजनिक बांधकाम विभागाला सामोरे जावे लागत होते. अनेक वर्ष रेंगाळलेले हे काम पुढील तीन-चार महिन्यात सुरु होणार असून या रस्त्याचे काम ‘हायब्रीड न्युइटी’ धोरणानुसार करण्यात येणार आहे. या बाबतची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. चाकण ते भांबोली 30 फुटी काँक्रीट रस्ता होणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.