चाकण : खंडणीसाठी चाकण येथून अपहरण करण्यात आलेल्या चार वर्षांच्या बालकाला अथक परिश्रम करून अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीत शोधून काढणार्या चाकण पोलिसांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरोद्गार चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पूजा कड यांनी काढले. रुद्र कोळेकर या चिमुकल्याचे मागील पंधरा दिवसांपूर्वी पंधरा लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण अपहरकर्त्यांनी अपहरण केले होते. अथक परिश्रम घेऊन पोलिसांनी रुद्र याला शोधून काढल्याबद्दल पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, उपनिरीक्षक महेश मुंढे व त्यांच्या अन्य सहकार्यांचा नागरी सत्कार नगराध्यक्षा पूजा कड यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी कड बोलत होत्या.
यावेळी पोलिस हवालदार रमेश नाळे, मुश्ताक शेख, अनिल गोरड, अजय भापकर, आदि पोलिस कर्मचार्यांनाही सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी नगरपरिषदेचे गटनेते व नगरसेवक किशोर शेवकरी, प्रकाश गोरे, प्रविण गोरे, प्रकाश भुजबळ, ऋषिकेश झगडे, नगरसेविका मंगल गोरे, सुजाता मंडलिक, स्नेहा जगताप, हुमा शेख, साहेबराव कड, अजय मनसुख उपस्थित होते. चाकण पोलिसांच्या कार्याचा गौरव करून पूजा कड म्हणाल्या, पोलिसांचे सर्वच क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. सर्वाना समान न्याय देणे हे काम खरोखरच समाधानकारक असून, पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सत्कार करणे ही काळाची गरज आहे. असेही त्या म्हणाल्या किशोर शेवकरी, प्रकाश भुजबळ, प्रवीण गोरे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. स्नेहा जगताप, सुजाता मंडलिक यांनी स्वागत केले. साहेबराव कड यांनी आभार मानले.