चाकण हिंसाचाराशी मराठा आंदोलकांचा संबंध नाही – आयुक्त आर. के

0
पिंपरी चिंचवड : चाकणमधील मराठा आंदोलन दुपारी दीड वाजता संपले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास आंदोलन पेटले. त्यामुळे झालेल्या हिंसाचाराशी मराठा आंदोलकांचा संबंध नसल्याचे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी स्पष्ट केले आहे. आयुक्त पद्मनाभन म्हणाले, चाकण येथे 30 जुलै रोजी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून आंदोलन झाले. हे आंदोलन दुपारी एक ते दीड वाजताच्या दरम्यान संपले. त्यानंतर काही समाजकंटकांनी आंदोलनाच्या नावाखाली हिंसक कारवाया केल्या. तोडफोड करणार्‍यांचे फोटो आणि चित्रफीत पोलिसांच्या हाती लागली असून त्यानुसार कारवाई करण्यास सुरवात केली आहे. यामुळे त्यांची पळापळ झाली आहे. मात्र आता ते मराठा आंदोलकांच्या नावाखाली आश्रय घेत आहेत.’’
शिष्टमंडळाने घेतली भेट…
मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाने नुकतीच माझी भेट घेतली. त्यावेळी त्यांना वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करणार्‍यांचे फोटो दाखविले. हे तुमचे आंदोलक आहेत का, याबाबत त्यांना विचारले असता यापैकी एकही आमचा कार्यकर्ता नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे चाकण हिंसाचाराशी मराठा आंदोलकांचा संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही आयुक्त पद्मनाभन म्हणाले.