चाकरमान्यांना दिलासा ; सुरत पॅसेंजर आजपासून दहा वाजेला सुटणार

0

रेल्वे टेंडरमधील सावळ्या गोंधळावर खासदारांचे बोट ; गैरप्रकार करणार्‍या अधिकार्‍यांची रेल्वे बोर्डाकडे करणार तक्रार

भुसावळ- भुसावळ स्थानकावर उशिराने दाखल होणार्‍या ईटारसी पॅसेंजरमुळे रावेर भागातील नोकरदारांसह प्रवाशांना जळगाव जाण्यासाठी गाडी नसल्याने त्यांची अतोनात गैरसोय होत असल्याने त्यांनी रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांच्याकडे तक्रार केली होती. खासदारांनी प्रवाशांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत शनिवारी रेल्वे विभागातील अधिकार्‍यांची बैठक घेत या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आग्रह धरल्यानंतर दररोज सकाळी 9.35 वाजता सुटणार्‍या सुरत पॅसेंजरच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. रविवारपासून ही गाडी आता ईटारसी पॅसेंजर आल्यानंतर दहा मिनिटांनी अर्थात 10.05 वाजता सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने नोकरदारांसह प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासदारांनी रेल्वे स्थानकावरील स्वच्छतेचा ठेका देताना झालेल्या सावळा-गोंधळाबाबत अधिकार्‍यांना थेट जाब विचारला तसेच रेल्वे कंत्राट देताना मोठा झोल होत असल्याचा आरोप करीत आपल्या तक्रारींची दखल न घेतल्यास रेल्वे जीएम यांच्यासह रेल्वे बोर्डाकडे तक्रार करण्याचा ईशारा दिल्याने अधिकार्‍यांना चांगलाच घाम फुटला. सोमवारपर्यंत आपल्या तक्रारींचे निरसन करावे अन्यथा भुसावळ विभागात झालेल्या सवर्र् कामांची चौकशीची मागणी करणार असल्याचा ईशारही त्यांनी दिल्याने रेल्वे अधिकार्‍यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

चाकरमान्यांना दिलासा ; सुरत पॅसेंजर अर्धा तास उशिराने सुटणार
रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांसंदर्भात तक्रारी असल्याने रक्षा खडसे यांनी शनिवारी दुपारी रेल्वे डीआरएम कार्यालय गाठून अपर मंडल प्रबंधक मनोज सिन्हा यांची भेट घेतली. रावेर भागातून मोठ्या प्रमाणावर नोकरदार तसेच खाजगी कर्मचारी नोकरी, व्यवसायानिमित्त जळगाव अप-डाऊन करतात मात्र ईटारसी पॅसेंजर आल्यानंतर जळगाव जाण्यासाठी त्यांना गाडी नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत होती. खासदारांनी या प्रश्‍नासंदर्भात अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर जो पर्यंत हा प्रश्‍न सुटत नाही, तोपर्यंत येथून हलणार नसल्याचा ईशारा दिला. विविध पर्यायावर चर्चा झाल्यानंतर सकाळी 9.35 वाजता सुटणार सुरत पॅसेंजरच्या वेळेत बदल करून ही गाडी रविवारपासून 10.5 वाजता सोडण्यावर एकमत झाले तर ईटारसी पॅसेंजरला ही गाडी कनेक्टींग असणार असल्याने रेल्वे प्रवाशांसह नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रेल्वे स्थानकावरील ई टेंडरमध्ये ‘झोल’
भुसावळ रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेसंदर्भात कोट्यवधी रुपयांचा ठेका देण्यात आला असून ई टेंडरमध्ये अनेक अटी व शर्तींचा भंग झाल्याची तक्रार रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अनिकेत पाटील यांनी खासदारांकडे केल्यानंतर खडसे यांनी विविध तांत्रिक मुद्यांवर अधिकार्‍यांना धारेवर धरले. आपल्या तक्रारींचे सोमवारपर्यंत निरसन करावे अन्यथा वरीष्ठ स्तरापर्यंत तक्रार करण्याचा ईशारा खडसेंनी दिला. भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव चांगले काम करीत असल्याचा आपल्याला अभिमान असून टेंडर कमेटीत गैरप्रकार होत असल्याचा आरोप खासदारांनी केला. कमी दराने कंत्राटदारांना टेंडर दिले जाते मात्र प्रत्यक्षात ठेकेदार कामे परवडत नाही म्हणून अर्ध्यावर सोडतात त्यामुळे केंद्राच्या पैशांच्या अपव्यय होतो, कामे देताना नियम व दर्जा तपासून द्यावीत, असे खडसे म्हणाल्या.

रेल्वे स्थानकावर अनधिकृत विक्रेत्यांचा सुळसुळाट
भुसावळ रेल्वे स्थानकावर अनधिकृत विक्रेत्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढल्याने या संदर्भात वरीष्ठ स्तरावर तक्रार करणार असल्याचे खासदार म्हणाल्या. अस्वच्छतेबाबतही तक्रारी आपल्याकडे येत असतात व वेळोवेळी आपण सूचनाही केल्याचे त्या म्हणाल्या. रेल्वे स्थानकावरील अवैध प्रकार बंद न झाल्यास आपण या संदर्भात लोकसभेतही आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी वरीष्ठ परीचालन प्रबंधक डॉ.स्वप्नील मीना, रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील, राजेश लखोटे, सुयश न्याती, सुमित बर्‍हाटे, गोलू पाटील आदींची उपस्थिती होती.