जळगाव : अजिंठा चौकात महामार्गावर थांबलेल्या ट्रक चालक शाहरुख शेख मुनीर शेख वय 22 रा. मुल्ला कॉलनी, धुळे यास चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत त्याच्याकडील 13 हजार रुपये लांबविल्याची घटना 15 जानेवारी रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली होती. गुन्हा दाखल होताच ट्रकचालकाला लुटणार्या मयुर हेमसिंग पाल (वय-20) आणि संदीप मधुकर निकम (वय-22) दोन्ही रा. गेंदालाल मिल या दोघांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
काय घडली होती घटना
याबाबत माहिती अशी की, शाहरूख शेख मुनिर शेख हे 15 जानेवारी रोजी रात्री ट्रक (क्र. एमएच 16.ए.ई 0065) घेवून जळगावात आले. त्यांनी नेरी नाका येथे भारत सर्कसचा सामान खाली केला. यानंतर अजिंठा चौफुलीजवळील हॉटेल मानसजवळ ट्रक उभा करुन ट्रकच्या कॅबिनमध्ये बसून होते. यादरम्यान ट्रक कॅबिनच्या दोन्ही बाजूने दोन संशयितांनी प्रवेश केला. त्यातील एकाने चाकूचा धाक दाखविला तर दुसर्याने चापटाबुक्क्यांनी मारहाण करुन चल पैसे निकाल नही तेरेको मार डालेंगे अशी धमकी दिली. ट्रकचालक मुनीर शेख यांच्या खिशातील ट्रकच्या भाड्यापोटी ठेवलेले 13 हजार रुपये रोख जबदरस्तीने काढून घेतले. यानंतर दोघे दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेनंतर ट्रकचालक याने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून संबंधित प्रकाराबाबत तक्रार दिली होती. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोघांना पोलीस कोठडी
लूट करणार्या संबंधित संशयितांबाबत पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट यांना मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, विजय पाटील, सचिन चौधरी, सचिन पाटील, सतीश गरजे, किशोर पाटील, हेमंत कळस्कर, आसीम तडवी या पथकाला सुचना केल्या. पथकाने माहितीनुसार शिवाजीनगर परिसरातील गेंदालाल मिल मधून मयुर हेमसिंग पाल आणि संदीप मधुकर निकम या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना जिल्हा न्यायालयातय हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली.