Jalgaon Traders Were Robbed by Faking an Accident : Gang of Six Accused In The Net
जळगाव : अपघाताचा बनाव करीत जळगावच्या व्यापार्याला चाकू लावून लुटण्यात आल्याची घटना एमआयडीसी परीसरातील महावितरणच्या सबस्टेशनसमोर शनिवार, 20 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली होती. लूट प्रकरणातील टोळीला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून संशयीतांना सोमवार, 22 ऑगस्ट रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना 25 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
अपघाताचा बनाव करीत लुटले
अमित बद्रीप्रसाद अग्रवाल (रा.अजिंठा सोसायटी, जळगाव) हे 20 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास एमआयडीसी एम सेक्टरमधील एमएसईबीच्या ऑफिससमोर आपल्या कारने जात असतांना दुचाकीने त्यांच्या कारला धडक दिली. दुचाकीवरील अनोळखी व्यक्तींनी अपघात झाल्याचा बनाव केला. त्यानंतर या लुटारूंनी अमित अग्रवाल आणि त्यांचे वडील बद्रीप्रसाद अग्रवाल यांना मारहान करुन व चाकुचा धाक दाखवून खिशातील दोन मोबाईल, डेबिट कार्ड, पॅनकार्ड क्रमांक असे काढून घेतले. एवढेच नव्हे तर चालकाचा मोबाईल आणि कारमधील दोन लाख 49 हजार 800 रुपयाची रोकड बळजबरीने हिसकावून पोबारा केला होता. या प्रकरणी अमित अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीनंतर आरोपी जाळ्यात
हा गुन्हा उमाळा व कुसूंबा येथील काही तरुणांनी केला असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक किशोर पाटील, इम्रान सैय्यद, सुधीर सावळे, सचिन पाटील, मुकेश पाटील, दिपक चौधरी, मुदस्सर काझी, साईनाथ मुंढे पोलीस चालक इम्तीयाज खान यांच्या पथकाने रात्रभरातच दीपक गजेंद्र मोहिते (28), प्रथमेश गंगाधर कोलते (19), शुभम ज्ञानेश्वर जाधव (22, तिन्ही रा.उमाळा, ता. जळगाव), उमेश रमेश मोहिते (22), तेजस संतोष इंगळे (23), कृष्णा रवींद्र पारधी (22, तिघे रा. कुसूंबा) या सहा जणांना संशयीतांना अटक केली. त्यांनी गुन्हयात वापरलेले होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल (क्रमांक जि.जे. 05 के वाय 1197) हि जप्त करण्यात आली.
आरोपींची कोठडीत रवानगी
अटकेतील सहा संशयीताना सोमवारी जिल्हा न्यायालयात न्या.जे.एस. केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना 25 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकारतर्फे अॅड.स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे व पोलिस हेड कॉन्स्टेबल रतीलाल पवार करीत आहेत.