चाकूने वार करत लुटण्याचा बनाव करणार्‍याचा एलसीबीकडून पर्दाफाश

0

गोळीबारात जखमी अन् अमळनेर पोलिसात लुटीची दिली फिर्याद

जळगाव- हॉटेलात साथीदारांसह जेवण करताना गोळीबार जखमी झाल्याने पोलिसांच्या भितीने चाकूने वार करुन संशयितांनी लुटण्याचा प्रयत्न केल्याचा बनाव केला होता. व तशी खोटी फिर्याद अमळेनर पोलिसात दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेने बनाव करणार्‍या राजेंद्र वासुदेव मराठे वय 25 रा नांद्री ता.अमळनेर या संशयितांचा पर्दाफाश केला असून त्याच्याकडून गावठी कट्टा हस्तगत केला आहे. तसेच त्याचा साथीदार मोहसीन सलीम खाटीक यालाही ताब्यात घेतले आहे.

अमळगाव येथील हॉटेलात राजेंद्र मराठे हा त्याच्या दोन मित्रासोबत जेवणास गेला होता. यावेळी मराठेच्या कमरेला लागलेल्या गावठी कट्ट्यातून चुकून गोळी निघाली व त्याच्या डाव्या छातीच्या व डाव्या बाजूस चाटून निघून या घटनेत मराठे जखमी झाला होता.

काय केला बनाव
गावठी कट्टा बाळगल्याच्या गुन्ह्यात अडकणार या भितीने मराठेने मलमपट्टी केल्यानंतर अमळनेर पोलीस स्टेशन गाठले. व याठिकाणी त्याने दुचाकीवरुन जळोद गावाकडून जात असताना चारचाकीतून आलेल्या तीन ते चार जणांनी चाकूने वार करत लुटण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केली. त्यावरुन अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला.

फिर्यादीच निघाला गुन्हेगार
पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या आदेशानुसा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम व अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांनी अमळनेर व स्थानिक गुन्हे शाखेचे पथके तयार केली होती. पोलीस उपनिरिक्षक सुधाकर लहारे, पोहेकॉ नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, विजय पाटील, मनोज दुसाने, विनयकुमार देसले, नरेंद्र वारुळे, मुरलीधर बारी, अमळनेर पोस्टेचे बापू साळुके, सुनील पाटील, किशोर पाटील, सुनील पाटील यांचा पथकात समावेश होता. पोऊनी लहारे व रामचंद्र बोरसे यांना राजेंद्र मराठे हा अमळगाव येथे हॉटेलात असताना गोळीबार झाल्याची गोपनीय माहिती मिळाली अन् प्रकरणाचा उलगडा झाला. मराठेची चौकशी करताच त्याने बनाव केल्याची कबूली दिली व गावठी कट्टा काढून दिला. यानतंर पथकाने त्याचा साथीदार मोहसीन खाटीकच्या मुसक्या आवळल्या. पुढील कारवाईसाठी त्यांना अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.