चाकू बाळगणारा तरुण यावल पोलिसांच्या जाळ्यात

यावल : यावल शहरातील बुरुज चौकात बेकायदेशीररीत्या धारदार चाकू घेऊन फिरणार्‍या 35 वर्षीय तरुणाला यावल पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातील धारदार चाकू हस्तगत करण्यात आला. याबाबत यावल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. देवानंद बाळू सपकाळे (35, रा.किल्ला झोपडपट्टी, शिवाजी नगर, यावल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
यावल शहरातील बुरुज चौकात रविवार, 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास एक तरुण हातात लोखंडी धारदार चाकू घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती यावल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे पथकाला आदेश दिले. संशयीत देवानंद बाळू सपकाळे (35) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याजवळील धारदार चाकू हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी रात्री 10 वाजता पोलिस हेड कॉन्स्टेबल सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी देवानंद सपकाळे याच्याविरोधात यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहे.