जळगाव । मित्राला भेटण्यासाठी आले युवकावर कृष्णा हॉस्पीटलसमोर सात ते आठ तरूणांनी मारहाण करून चाकू हल्ला चढवला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांनी सोमवारी रात्री जयेश देवीदास तायडे उर्फ पाच्या याला अटक केली आहे. त्याला आज मंगळवारी न्या. के.एस.कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला 22 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
घेराव घालून खगेशला मारहाण
सदशिव नगर येथील रहिवासी खगेश दिलीप कोल्हे हा युवक रंगपंचमीमुळे महाविद्यालयाला सुट्या असल्यामुळे घरी आला होता. त्यानंतर पुन्हा 15 मार्चला पुन्हा पुण्याला जाणार असल्याने त्या आधी मित्राला भेटून जावे म्हणून तो त्याच दिवशी दुपारी 12 वाजता शाहु कॉम्पलेक्स परिसरातील कृष्णा हॉस्पीटलमध्ये कामाला असलेल्या मित्राला भेटण्यासाठी गेला. मित्राची गप्पा मारल्यानंतर खगेश हा हॉस्पीटलसमोर उभा असतांना सात ते आठ तरूणांनी त्याला घेराव घालून मारहाण केली. यात एकाने त्याच्या पोटात चाकू मारून जखमी केले. यानंतर त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांनी सोमवारी रात्री 11 वाजता जयेश देवीदास तायडे उर्फ पाच्या रा. हरिओम नगर, जैनाबाद अटक केली. त्यानंतर त्याला आज मंगळवारी न्यायाधीश के.एस.कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. कुलकर्णी यांनी संशयित जयेश तायडे याला चाकू हल्ल्याप्रकरणी 22 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. अविनाश पाटील यांनी आरोपीपक्षातर्फे अॅड. अजय सिसोदीया यांनी कामकाज पाहिले.