जळगाव। शहरातील राजीवगांधीनगरात बुधवारी रात्री अकराच्या सुमारास किरकोळ कारणावरून वाद होऊन एका तरूणावर चाकु हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, तरूण गंभीर जखमी झाल्याने त्याला जिल्हा रूग्णालयातून उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले होते. मात्र, आज शुक्रवारी सकाळी त्याचा उपचार घेत असतांना मृत्यू झाला आहे. राहूल प्रल्हाद सकट असे मयत तरूणाचे नाव आहे.
अशी घडली होती घटना
राजीव गांधीनगर परिसरात बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास राहुल प्रल्हाद सकट (वय-25) हा तरुण घराबाहेर हातगाडीवर जेवण करीत असतांना सत्यासिंग बावरी याने त्याला विनाकारण डोक्यावर टपली मारत दारुसाठी पैसे मागीतले. यावरुन किरकोळ वाद होऊन राहुल सकट घरात शिरला. त्याच्या मागेच सत्यासिंग बावरी, त्याचा भाऊ करतारसिंग व मालाबाई, कालीबाई बावरी आदी चौघे राहुलच्या घरी आले. राहुल याला घरातून बोलावून वाद घालत त्यांनी राहुल चा भाऊ अजय व आई म्हाळसाबाई यांना मारहाण करण्यास सुरवात केली. हाणामारीत सत्याने लपवून आणलेला चॉपर राहुलच्या पोटात खुपसला. जखमी राहुल याला तात्काळ जिल्हा रुग्णायलयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
एकाची पोलिस कोठडीत रवागनी
राहूल याच्या भाऊ अजय सकट याच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आला होता. त्यानंतर रात्रीतून निरीक्षक बी.जे.रोहम यांच्या पथकाने कालीबाई बावरी हिला अटक केली, उर्वरीत सत्यासींग, करतारसींग व मालीनबाई पळून जाण्यात यशस्वी ठरले. अटकेतील कालीबाईला न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवस पोलिस कोठडीत सुनावली होती.
नाशिकमध्येच केले शवविच्छेदन
बुधवारी रात्रीच राहूलला जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतू प्रकृति गंभीर असल्यामुळे त्याला दुसर्या दिवशी लागलीच नाशिक येथे खाजगी रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. यानंतर त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. परंतू शुक्रवारी सकाळी उपचार घेत असतांना राहूल सकट या तरूणाचा मृत्यू झाला. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. नाशिक येथे राहूलच्या मृतदेहावर शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी मृतदेह जळगावी आणला. राहूलच्या मृत्यूमुळे राजीवगांधीनगरात तणावाचे वातावरण होऊन मारेकर्यांना अटकेची मागणी झाली. दरम्यान, सायंकाळी राजीवगांधीनगरात मृतदेह रूग्णवाहिकेतून दाखल होताच परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव जमून तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी तगडा पोलिस बंदोस्त देण्यात आला होता. डिवायएसपी सचिन सांगळे व पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम देखील घटनास्थळी हजर होते. मात्र, रात्र उशिरापर्यं पोलिस बंदोबस्त तैनात होता.